IND vs AUS Playing XI: रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ वनडे विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात आज पाचवेळा जगज्जेता राहिलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध भिडणार आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाला नमविणे सोपे नाही, याची भारताला जाणीव आहे. रवी अश्विनला तिसरा फिरकीपटू म्हणून खेळविणे, सूर्या कुमार यादवची उपयुक्तता, शार्दूल ठाकूरला प्रोत्साहन देणे आणि मिचेल स्टार्कसारख्याला घाबरण्याची गरज नाही हे इशान किशनला समजावून सांगणे, अशा विविध पातळ्यांवर रोहितची परीक्षा असणार आहे.
भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघ मोठ्या अडचणीचा सामना करत आहे. संघाचा सर्वात स्फोटक अष्टपैलू मार्कस स्टॉइनिस हा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीने त्रस्त असून भारताविरुद्ध खेळणे त्याच्यासाठी कठीण आहे. अशा स्थितीत कमिन्स स्टोइनिसच्या जागी कॅमेरून ग्रीनचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करू शकतो. ग्रीन देखील आक्रमक फलंदाजी करतो आणि खालच्या ऑर्डरमध्ये वेगाने धावा करू शकतो. त्याचबरोबर यष्टिरक्षक म्हणून जोश इंग्लिशपेक्षा अॅलेक्स कॅरीला प्राधान्य दिले जाऊ शकते. अनुभवी डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श हेच सलामीला येतील. त्याचवेळी स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लॅबुशेन हे मधल्या फळीची जबाबदारी सांभाळताना दिसतील.
ऑस्ट्रेलियाप्रमाणेच भारताकडूनही एका खेळाडूच्या खेळण्यावर शंका आहे. सलामीवीर शुभमन गिल आजारी असून मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याला डेंग्यू झाला आहे. त्याच्या खेळावर साशंकता कायम आहे. मात्र, प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा या दोघांनीही आपल्या पत्रकार परिषदेत शुबमनच्या खेळण्याबाबतचा निर्णय नाणेफेकीपूर्वी घेतला जाईल, असे सांगितले होते, परंतु मिळालेल्या माहितीनुसार, शुभमन अद्याप यातून सावरलेला नाही.
शुभमन खेळला नाही तर रोहितसह ईशान किशनला सलामीची जबाबदारी दिली जाऊ शकते. त्याचबरोबर श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांच्यापैकी एकाला मधल्या फळीत संधी मिळू शकते. श्रेयस चांगली फिरकी खेळतो, त्यामुळे त्याला सूर्यापेक्षा प्राधान्य दिले जाऊ शकते. रविचंद्रन अश्विन आणि शार्दुल ठाकूर यांच्यातही एकाची निवड करण्यासाठी लढत होणार आहे. मात्र, चेपॉकचा अलीकडचा विक्रम आणि या सामन्यासाठी तयार केलेली कोरडी, काळ्या मातीची खेळपट्टी लक्षात घेता संघ व्यवस्थापन अश्विनच्या रूपाने तिसरा फिरकीपटू मैदानात उतरवण्याची दाट शक्यता आहे.
ऑस्ट्रेलियाचे संभाव्य प्लेइंग XI
डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (सी), जोश हेझलवूड, अॅडम झाम्पा.
भारताची संभाव्य प्लेइंग XI
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल/इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर/सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
विश्वचषकासाठी दोन्ही संघ
ऑस्ट्रेलिया: पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, शॉन अॅबॉट, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क.
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.
Web Title: IND vs AUS Playing XI: India to face Australia with 3 spinners; Suryakumar Yadav or Shreyas Iyer?, Lets Know, Possible Playing XI
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.