नागपूर, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : अखेरच्या षटकात दोन विकेट्स मिळवत विजय शंकर हा सामन्याच्या हिरो ठरला. यावेळी अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 11 धावांची गरज होती. त्यावेळी कोणत्याही गोलंदाजावर प्रेशर नक्कीच येणार. तसे ते विजय शंकरवरही होते, पण त्यापेक्षा जास्त दडपण त्याला वेगळ्या गोष्टीचे आले होते. विजय शंकरनेच ही गोष्ट सामन्यानंतर सांगितली आहे.
भारताच्या 251 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 242 धावांत आटोपला. त्यामुळे भारताला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आठ धावांनी विजय मिळवता आला. अखेरच्या षटकामध्ये ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 11 धावांची गरज होती. पण विजय शंकरने या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर स्टॉइनिसचा अडसर दूर केला. स्टॉइनिसने चार चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 52 धावांची खेळी साकारली. तो बाद झाल्यावर दुसऱ्या चेंडूवर दोन धावा ऑस्ट्रेलियाने काढल्या. पण तिसऱ्या चेंडूवर शंकरने अॅडम झाम्पाला त्रिफळाचीत करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
सामना संपल्यावर चहल टीव्हीमध्ये यावेळी भारताचा कर्णधार विराट कोहली आणि विजय शंकर यांची मुलाखत घेण्यात आली. कोहलीने यावेळी विजय शंकरवर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला. यानंतर भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने विजय शंकरला एक प्रश्न विचारला आणि त्यानंतर लास्ट ओव्हरपेक्षा मला एका गोष्टीचे दडपण जास्त आहे, असे विजय शंकरने मान्य केले आहे.
या मुलाखतीच्यावेळी कोहली म्हणाला की, " विजय शंकरने कठीण परिस्थितीमध्ये चांगली फलंदाजी केली. त्याच्या धावा संघासाठी फार मोलाच्या ठरल्या. त्याचबरोबर अखेरच्या षटकात विजय शंकरने भेदक मारा केला. चांगली कामगिरी करण्यासाठी तुमची मानसीकता सक्षम असावी लागते. विजय शंकरने आपली गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे."
यानंतर चहल विजय शंकरला प्रश्न विचारण्यासाठी आला. चहलने विजय शंकरला विचारले की, " हे एक हिंदी चॅनल आहे. त्यामुळे तुला हिंदीमध्ये बोलावे लागेल. तेव्हा विजय शंकर हसला. त्यावर चहल म्हणाला की," लास्ट ओव्हर टाकताना तुझ्यावर जेवढे प्रेशर नव्हते, तेवढे आता आले आहे का? यावेेळी विजय शंकरनेही ही गोष्ट मान्य केली आणि म्हणाला की, " लास्ट ओव्हर टाकण्यापेक्षा मला हिंदी बोलण्याचे जास्त दडपण आहे."