भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताने पहिला सामना जिंकला खरा, पण त्यांच्या सलामीवीरांना अजून दमदार कामगिरी करता आली नाही. दुसरीकडे भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ हा पूर्णपणे फिट झाला असून दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी तो संघात पुरनरागमन करू शकतो. पण जर पृथ्वीला संघात स्थान दिले तर कोणत्या खेळाडूला डच्चू मिळू शकतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
पहिल्या कसोटी सामन्यात सलामीवीर मुरली विजयला दोन्ही डावांमध्ये मोठी खेळी साकारता आलेली नाही. त्याचबरोबर इंग्लंड दौऱ्यातही त्याची कामगिरी निराशानजक होती. दुसरीकडे लोकेश राहुललाही आपली छाप पाडता आलेली नाही. पण विजयपेक्षा त्याने गेल्या पाच सामन्यांमध्ये जास्त धावा केल्या आहेत. त्यामुळे फॉर्मचा विचार केला तर राहुल संघात राहू शकतो आणि विजयला डच्चू मिळू शकतो. पण जर अनुभव आणि सराव सामन्यावर नजर फिरवली तर मुरली संघात राहुन राहुलला वगळण्यात येऊ शकते.
पहिल्या कसोटी सामन्यात पृथ्वी खेळणार हे पक्के समजले जात होते. पण पहिल्या सामन्यापूर्वी सराव करत असताना पृथ्वीच्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे त्याला पहिल्या कसोटी सामन्याला मुकावे लागले होते. आता दुसरा कसोटी सामना 14 डिसेंबरपासून पर्थ येथे होणार आहे. या सामन्यात पृथ्वीला संधी मिळणार की, मुरली आणि राहुल यांना कायम ठेवणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.