भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताचा युवा यष्टीरक्षकने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. त्याचबरोबर या सामन्यात 11 झेल टीपत त्याने एका सामन्यात सर्वाधिक झेल पकडण्याचा मानही पटकावला आहे.
पंतने पहिल्या डावात सहा झेल पकडले होते. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याने 5 झेल टीपले. त्यामुळे एका सामन्यात 11 झेल पकडणारा तो पहिला भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे. त्याचबरोबर क्रिकेट विश्वामध्ये अकरा झेल पकडणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी क्रिकेट विश्वामध्ये इंग्लंडचा जॅक रसेल आणि दक्षिण आफ्रिकेचा ए बी डी' व्हिलियर्स यांनी हा पराक्रम केला आहे. पण आतापर्यंत एकाही यष्टीरक्षकाला 12 झेल टीपता आलेले नाहीत. त्यामुळे पंतने या सामन्यात 11 झेल पकडत विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या डावात पंतने मिचेल स्टार्कचा झेल पकडला. हा त्याचा अकरावा झेल होता.
अत्यंत रंगतदार झालेल्या अॅडलेड कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर 31 धावांनी मात करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाने या विजयाबरोबरच अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पहिल्याच कसोटीत विजय मिळवण्याची भारतीय संघाची ही पहिलीच वेळ ठरली आहे. त्याबरोबरच दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये कसोटी सामने जिंकणारा विराट कोहली हा भारताचा पहिला कर्णधार ठरला आहे. विशेष म्हणजे विराटच्या नेतृत्वाखाली एकाच वर्षात भारतीय संघाला या तिन्ही देशांमध्ये विजय मिळाले आहेत.