सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : रिषभ पंतचे सध्या अच्छे दिन सुरु आहेत. कारण पंतवर चहुबाजूंनी स्तुतीसुमनांचा वर्षाव होत असल्याचे पाहायला मिळते आहे. मग ते ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान असो किंवा भारत आर्मी, त्यांनी पंतचे कौतुकच केले आहे. आता तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगनेही पंतची स्तुती केली आहे. पंत हा दुसरा अॅडम गिलख्रिस्ट असल्याचे मत पॉन्टिंगने व्यक्त केले आहे.
सिडनी कसोटी सामन्यात पंतने दमदार खेळी साकारली. त्याने साकारलेल्या नाबाद 159 धावांच्या खेळीच्या जोरावर भारताला 622 धावांचा डोंगर उभारता आला होता. या खेळीमुळे त्याचे भारतीय कसोटी संघातील स्थान निश्चित समजले जात आहे. कारण भारतापुढे पंतसारखा दुसरा पर्यायही दिसत नाही.
एका मुलाखतीमध्ये पॉन्टिंग म्हणाला की, " पंत चांगली फटकेबाजी करतो. आयपीएलमध्ये दिल्लीच्या संघाबरोबर असताना मी त्याला मार्गदर्शन केले आहे. त्याचे फटके हे चांगलेच जोरकस असतात. पण त्याने यष्टीरक्षणामध्ये नक्कीच सुधारणा करायला हवी. माझ्यामते त्याने जर यष्टीरक्षण अजून चांगले केले तर क्रिकेट विश्वाला दुसरा अॅडम गिलख्रिस्ट नक्कीच मिळू शकतो."
पंत जर भारताच्या कसोटी संघात कायम राहीला तर त्याला बीसीसीआयला आपल्या करारश्रेणीमध्ये सामावून घेऊ शकते. बीसीसीआयच्या करारामध्ये A+, A, B आणि C अशा विविध श्रेणी आहेत. जे खेळाडू अतिमहत्वाचे आहेत किंवा जे सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळतात त्यांना सर्वोच्च श्रेणी देण्यात येते. त्याचबरोबर जे फक्त कसोटी क्रिकेट खेळतात त्यांनाही पहिल्या दोन श्रेणींमध्ये स्थान दिले जाऊ शकते.