Rohit Sharma team India, IND vs AUS Test: ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणाऱ्या आगामी कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया कसून सराव करत आहे. मात्र, त्याआधी भारतीय संघाला एक धक्का बसला आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा या मालिकेतील सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये रोहित शर्मा उपलब्ध नसण्याची शक्यता वर्तवली जात असून त्यामागे 'वैयक्तिक कारण' असल्याचेही बोलले जात आहे. रोहितने बीसीसीआय आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकरला याबाबत कल्पना दिल्याचीही माहिती आहे. त्यामुळे जर रोहित शर्मा संघात नसेल तर संघाचा सलामीवीर कोण असेल, याबाबत विविध नावांची चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, रोहित शर्मा हा ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या दोन सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. त्याने बीसीसीआय आणि निवडकर्त्यांना सांगितले की तो काही वैयक्तिक बाबी सोडवण्याचा प्रयत्न करत आहे आणि जर त्या बाबी सोडवल्या गेल्या नाहीत तर तो पहिल्या सामन्यातून बाहेर पडू शकतो. परंतु त्याने असेही नमूद केले आहे की, मी केवळ कल्पना दिली आहे. तो उपलब्ध नाही असे त्याने सांगून ठेवले आहे. अशा परिस्थितीत निवड समिती आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ संघाची घोषणा करण्यापूर्वी रोहितची चर्चा करेल. तसेच, रोहितने बीसीसीआयला असेही सांगितल्याची चर्चा आहे की, मालिका सुरू होण्यापूर्वी वैयक्तिक बाबी सोडवल्या गेल्या तर तो पाचही कसोटी सामने खेळू शकतो.
रोहित नसल्यास सलामीला कोण येणार? कर्णधार कोण?
जर रोहित शर्मा सुरुवातीला खेळला नाही तर फॉर्ममध्ये असलेला अभिमन्यू ईश्वरन त्याचा 'कव्हर' म्हणून खेळू शकतो. शुभमन गिल आणि केएल राहुल हे देखील सुरुवातीच्या स्लॉटमध्ये खूप अनुभवी खेळाडू आहेत. पण अभिमन्यू ईश्वरन हा त्या काळात भारत अ संघासोबत ऑस्ट्रेलियातच असणार आहे, त्यामुळे त्याला संधी दिली जाऊ शकेल. तसेच रोहित नसताना कर्णधार कोण असेल याबाबतही विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेत कोणीही उपकर्णधार नव्हता, त्यामुळे याबाबतचा निर्णय आयत्या वेळीच घेतला जाईल, असे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत केएल राहुल, शुभमन गिल, रिषभ पंत किंवा जसप्रीत बुमराह यांच्यापैकी कोणालाही हे पद तात्पुरते दिले जाऊ शकेल.
Web Title: IND vs AUS Rohit Sharma may miss start of Australia test series who will the captain and opener these names in fray
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.