नवी दिल्ली: सलामीचा स्टार फलंदाज रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघासोबत जुळण्यास सज्ज झाला आहे. तथापि अखेरच्या दोन सामन्यात तो खेळू शकेल की नाही याचा निर्णय वैद्यकीय पथकाच्या परवानगीनंतरच होईल,अशी माहिती बीसीसीआयने शनिवारी दिली. तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीत रोहित खेळण्यास फिट आहे की नाही, हे बीसीसीआयचे वैद्यकीय पथक ठरवणार आहे.यूएईत नुकत्याच झालेल्या आयपीएलदरम्यान रोहितला स्नायूंचे दुखणे उमळले होते. दुखण्यातून सावरण्यासाठी रोहितने बेंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सराव केला. तो फिटनेस चाचणीत उत्तीर्ण झाला तरी कोरोना विलगीकरणाच्या नियमानुसार रोहितला भारतीय संघात खेळण्यास पुढील काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल. १७ डिसेंबरपासून खेळल्या जाणाऱ्या चारपैकी पहिल्या दोन सामन्यात तो खेळू शकणार नाही. ‘१९ नोव्हेंबरपासून येथे सराव करणाऱ्या रोहितने एनसीएत फिटनेस चाचणी उत्तीर्ण केली असून १४ डिसेंबर रोजी तो ऑस्ट्रेलियाकडे रवाना होईल. आयपीएल दरम्यान त्याच्या डाव्या पायाचे स्नायू ताणले गेले होते. एनसीएत त्याने उपचार घेतला. आता वैद्यकीयदृष्ट्या तो निवडीसाठी उपलब्ध आहे, एनसीएतील वैद्यकीय पथक रोहितच्या फिटनेसबाबत समाधानी असून त्याला क्षमता वाढविण्यासाठी आणखी मेहनत घ्यावी लागेल’,असे बीसीसीआयच्या सूत्रांनी स्पष्ट केले. वृत्तानुसार वैद्यकीय पथकाने विविध प्रकारे रोहितच्या फिटनेसची चौकशी केली. त्याविषयी समाधानही व्यक्त केले. शारीरिक तंदुरुस्ती चांगली असली तरी रोहितला स्वत:ची ताकद वाढविण्यासाठी आणखी मेहनत घ्यावी लागणार आहे. ऑस्ट्रेलिया सरकारच्या कोरोना नियमावलीनुसार रोहित ७ ते ११ आणि १५ ते १९ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या दोन्ही कसोटी सामन्यांसाठी सराव करण्याआधी विलगीकरणात असेल. मागील काही आठवड्यांपासून रोहितच्या फिटनेसबाबत संभ्रम होता. कर्णधार विराट कोहली या मुद्यावर संवादाचा अभाव असल्याचे वक्तव्य केले होते.ऑस्ट्रेलियात दोन आठवड्यांच्या विलगीकरणा-दरम्यान त्याला सरावाचे वेगळे वेळापत्रक देण्यात आले आहे. त्याचे काटेकोर पालन करावेच लागेल. विलगीकरण आटोपताच बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याची तपासणी करणार असून त्यानंतरच गावसकर- बॉर्डर चषक मालिकेत तो खेळणार की नाही याचा निर्णय घेतला जाईल.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- Ind vs Aus: अखेरच्या दोन कसोटीसाठी रोहित शर्माचा होणार विचार
Ind vs Aus: अखेरच्या दोन कसोटीसाठी रोहित शर्माचा होणार विचार
वैद्यकीय समितीकडून हिरवा झेंडा मिळाल्यानंतरच खेळू शकणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2020 2:47 AM