भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताचा आजचा विजय पाहून मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला थेट 2003 साली झालेल्या दौऱ्याची आठवण झाली आहे. आपल्या एका ट्विटमध्ये त्याने या विजयाबद्दल आणि आपल्या आठवणींबद्दल लिहीले आहे. सचिनने ही पोस्ट आपल्या ट्विटरवर शेअर केली आहे.
सचिनने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, " भारतीय संघाची ही सुरेख कामगिरी आहे. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी दमदार फलंदाजी केली. त्याचबरोबर गोलंदाजांनी भेदक मारा केला. भारतीय संघाची ही नेत्रदीपक कामगिरी पाहून मला 2003च्या दौऱ्याची आठवण आली. 2003 साली ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्याच्या माझ्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. "
उत्कंठावर्धक झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात अखेर भारताने ऑस्ट्रेलियावर 31 धावांनी विजय मिळवला. अखेरच्या डावात ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या फलंदाजांनी कडवी झुंज दिली. पण अखेर सामना जिंकण्यात कोहलीसेनेला यश आले. हा सामना भारताने 31 धावांनी जिंकला.