IND vs AUS: भारतीय संघ सध्या आशिया चषक स्पर्धेत खेळत आहे. पाकिस्तानला ५ गडी राखून पराभूत करत भारताने आपल्या स्पर्धेची विजयी सुरूवात केली आहे. आशिया चषकातील सामने संपल्यानंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघांशी ३-३ सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे. यातील ऑस्ट्रेलियन संघाविरूद्धची मालिका २० ते २५ सप्टेंबर दरम्यान रंगणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या या भारत दौऱ्याआधी त्यांच्या संघाची चिंता वाढवणारी एक गोष्ट घडली. ऑस्ट्रेलिया विश्वविजेता बनवण्यात मोलाचा वाटा उचलणारा ऑलराऊंडर खेळाडू मिचेल मार्श दुखापतग्रस्त झाल्याने कांगारूंचे 'टेन्शन' वाढले आहे.
ऑस्ट्रेलियाला अजून ३१ ऑगस्ट आणि ३ सप्टेंबरला झिम्बाब्वेविरुद्ध दोन वनडे खेळायचे आहेत. यानंतर त्यांचा संघ न्यूझीलंडमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांसाठी यजमानपद भूषवणार आहे. हे सामने ६ ते ११ सप्टेंबर दरम्यान होणार आहेत. त्यानंतर २० ते २५ सप्टेंबर दरम्यान तीन टी२० सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर येणार आहे. या सामन्यांआधीच मार्शला दुखापत झाल्याने ही संघासाठी चिंतेची बाब मानली जात आहे.
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श हा घोट्याच्या किरकोळ दुखापतीमुळे झिम्बाब्वे आणि न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सामन्यांमधून बाहेर पडला आहे. टी२० विश्वचषकापूर्वी होणाऱ्या भारत दौऱ्यासाठी तो तंदुरुस्त होण्याची शक्यता आहे. परंतु, तसे असले तरी विश्वचषक स्पर्धेला प्राधान्य देण्यात येणार असल्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डापुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ईएसपीएनक्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, मार्शची जागा वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक-फलंदाज जोश इग्लिसने घेतली आहे. तो सध्या द हंड्रेड स्पर्धेत इंग्लंडमध्ये लंडन स्पिरिटकडून खेळत आहे. तेथून तो थेट संघात सामील होणार आहे.
मार्शच्या दुखापतीबाबत अहवालात देण्यात आलेल्या माहितीनुसार त्याच्या घोट्याला झालेली दुखापत ही किरकोळ स्वरूपाची असल्याचे म्हटले आहे. पण टी२० विश्वचषकाच्या दृष्टीने खबरदारी म्हणून त्याला आगामी दोन्ही मालिकांतून वगळण्याचा निर्णय घेतला गेला आहे. त्याने झिम्बाब्वे विरूद्धच्या सहा षटकांत २२ धावा देऊन एक विकेट घेतली. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना त्याला केवळ दोन धावा करता आल्या.