IND vs AUS T20 2022 Live Match Scorecard : अक्षर पटेलची उल्लेखनीय गोलंदाजी आणि रोहित शर्माच्या वादळी खेळीच्या जोरावर भारताने ८-८ षटकांच्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. मागील तीन दिवस नागपूरात पावसाने थैमान माजवले होते, परंतु आज संपूर्ण दिवस पाऊस पडला नाही. पण, मैदान सुकवायला पूर्ण दिवस पूरला नाही. अडीच तास उशीराने सामना सुरू झाल्याने ८-८ षटकंच खेळवण्यात आली. भारताच्या विजयानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) मैदानावर आला आणि त्यान मैदान सुकवण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या ग्राऊंड्समन्सच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. द्रविडच्या या कृतीने सर्वांची मन जिंकली. द्रविडची पत्नी विजेता ही नागपूरचीच आहे आणि जावयाने आपल्या सासरच्यांचा चांगला मान केला.
ऑसी कर्णधार अॅरोन फिंच व मॅथ्यू वेड यांनी दमदार खेळ करताना भारतासमोर तगडे लक्ष्य उभे केले. अक्षर पटेल पुन्हा एकदा उपयुक्त गोलंदाज ठरला, परंतु इतरांनी निराश केले. फिंच १५ चेंडूंत ३१ धावा करून माघारी परतला. वेडने २० चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ४३ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने ५ बाद ९० धावा केल्या. हर्षलने २ षटकांत ३२ धावा दिल्या. अक्षर पटेलने १७ धावांत ३ विकेट्स घेतल्या. जोश हेझलवूडच्या पहिल्याच षटकात रोहितने षटकार खेचून आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सर्वाधिक १७३* Six चा विक्रम नावावर केला. न्यूझीलंडचा मार्टिन गुप्तील १७२ षटकारांसह दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे.
लोकेश राहुल ( १०), विराट कोहली ( ११), सूर्यकुमार यादव ( ०) व हार्दिक पांड्या ( ९) माघारी परतले असतानाही रोहितने खिंड लढवली. ऑसींच्या अॅडम झम्पाने २ षटकांत १६ धावांत ३ विकेट्स घेतल्या. रोहितने २० चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारासह नाबाद ४६ धावा केल्या. अखेरच्या षटकात दिनेश कार्तिकने दोन चेंडूंत षटकार-चौकार खेचून नाबाद १० धावा करताना भारताचा ६ विकेट्सने विजय पक्का केला. भारताने हा सामना जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली.