IND vs AUS T20 2022 Live Match Scorecard : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातला दुसरा ट्वेंटी-२० सामना अडीच तासांच्या विलंबानंतर अखेर सुरू होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी जल्लोष साजरा केला आहे. नागपूरात आज दिवसभर पाऊस पडला नसला तरी मागील तीन दिवस येथे पाऊस पडला आणि त्यामुळे खेळपट्टी ओलीच होती. मैदान सुकवण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागली होती. ६.३०, ७, ८ व ८.४६ वाजता अम्पायर्सकडून मैदानाची पाहणी केली गेली. त्यानंतर अम्पायर्सने हिरवा कंदील दिला.
भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिका वाचवण्यासाठी आजचा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. मागील तीन दिवस येथे पाऊस सतत सुरू असल्याने खेळपट्टी अजूनही हवी तशी सुकलेली नव्हती. सायंकाळी ६.३० वाजता नाणेफेक होणार होती, परंतु अम्पायर्सनी खेळपट्टीची पाहणी केली. ७ व ८ वाजता पुन्हा पाहणी झाली. तेव्हाही अम्पायर्स खेळपट्टीबाबत समाधानी दिसले नाही आणि त्यांनी दोन्ही कर्णधारांना बोलावून परिस्थितीबाबत सांगितले.
केएन अनंथपद्मनाभन आणि नितीन मेनन यांनी खेळपट्टीची पाहणी केली. त्यांच्यासोबत चौथा अम्पायर अनिल चौधरी हेही उपस्थित होते. खेळपट्टी ओली असल्याने खेळाडूंना दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर एकाही खेळाडूचे जखमी होणे संघाला महागात पडणारे ठरेल. त्यामुळे अम्पायर पूर्ण सहानिशा करताना दिसले. ८ वाजता खेळपट्टीची पाहणी केल्यानंतर अम्पायर्सनी दोन्ही कर्णधारांशी संवाद साधला. आता पुन्हा ८.४५ वाजता खेळपट्टीची पाहणी केली गेली. चौथ्यांदा पाहणी केल्यानंतर अम्पायर्सनी समाधान व्यक्त केले आणइ ९.३० वाजता सामना सुरू होईल असे जाहीर केले. प्रत्येकी ८-८ षटकांचा सामना होणार असून दोन षटकं पॉवर प्लेची असणार आहेत.