India vs Australia T20I Series : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यातील भारताच्या पराभावाला गोलंदाजांची निराशाजनक कामगिरी कारणीभूत आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा तोंडावर आली असताना कर्णधार रोहित शर्मा व संघ व्यवस्थापनाला गोलंदाजांच्या कामगिरीची चिंता लागली आहे. त्यामुळेच मोहालीतील सामना संपल्यावर रोहित व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी इमर्जन्सी मिटींग बोलावून गोलंदाजांची शाळा घेतली. या सामन्यात जसप्रीत बुमराह ( Jasprit Bhumrah) खेळला नव्हता आणि नागपूर सामन्याआधी त्याच्याबाबतची महत्त्वाचे अपडेट्स समोर आले आहेत. आज पत्रकारांशी संवाद साधताना सूर्यकुमार यादवने जसप्रीतबाबत माहिती दिली.
१३ ऑक्टोबर पासून ट्वेंटी-२० वर्ल्ड कपला सुरूवात होतेय आणि २३ तारखेला भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान आहे. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारताला अधिकचा सराव मिळावा यासाठी ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्धच्या मालिकेचे आयोजन केले गेले. पण, पहिल्या सामन्यात २०८ धावा करूनही भारताला हार मानावी लागली. या पराभवानंतर रोहित, राहुल व गोलंदाज प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे यांनी महत्त्वाची बैठक बोलावली. यावेळी मानसिक कंडिशनिंग प्रशिक्षक पॅडी अप्टनही उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर अप्टन यांनी भारतीय गोलंदाजांसह वैयक्तिक सेशन घेतले. अक्षर पटेल ( ३-१७) वगळल्यास भुवनेश्वर कुमार ( ४-०-५२-०), हर्षल पटेल ( ४-०-४९-०), हार्दिक पांड्या ( २-०-२२-०), युजवेंद्र चहल ( ३.२-०-४२-१) व उमेश यादव ( २-०-२७-०) यांनी निराश केले.
भारतीय गोलंदाजांचे मानसिक खच्चिकरण झाले असावे, असे संघ व्यवस्थापनाला वाटतेय. त्यामुळे पॅडी अप्टन यांनी त्यांच्यासोबत वन ऑन वन सेशन घेतला. बैठकीला हार्दिक पांड्या, रोहित, लोकेश राहुल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल व दीपक चहर उपस्थित होते. युजवेंद्र चहर, आर अश्विन, अक्षर पटेल व उमेश यादव यांनीही सहभाग घेतला. दरम्यान, जसप्रीत बुमराह पूर्णपणे फिट असून चिंता करण्याचे कारण नसल्याचे सूर्यकुमार यादवने आज सांगितले.