Join us  

IND vs AUS T20I : ऑस्ट्रेलियन संघात मोठी घडामोड; भारत दौऱ्यावर येण्यापूर्वीच तीन स्टार खेळाडूंची माघार, जाणून घ्या कारण 

IND vs AUS T20I : गतविजेता ऑस्ट्रेलियन संघ आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघाच्या तयारीसाठी भारत दौऱ्यावर दाखल झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 12:41 PM

Open in App

IND vs AUS T20I : गतविजेता ऑस्ट्रेलियन संघ आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघाच्या तयारीसाठी भारत दौऱ्यावर दाखल झाला आहे. मायदेशात होणाऱ्या वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाविरुद्ध खेळून चांगला सराव करून घ्यावा, यासाठी ऑसी संघ तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. डेव्हिड वॉर्नरला या मालिकेत विश्रांती दिली आहे आणि त्यात आणखी धक्का देणारी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचे तीन स्टार खेळाडू भारत दौऱ्यावर येणार नाही. मिचेल स्टार्क, मिचेल मार्श व मार्कस स्टॉयनिस असे या स्टार खेळाडूंची नावं आहेत. त्यांच्याजागी आता नॅथन एलिस, डॅनिएल सॅम्स व सीन एबॉट यांचा समावेश करण्यात आला आहे.

भारत दौऱ्यापूर्वी ऑस्ट्रेलियासाठी हा मोठा धक्का आहे. स्टार्कला गुडघ्याची दुखापत, मार्शला पोटरीची दुखापत अन् स्टॉयनिसला पाठीच्या दुखापतीने त्रस्त केले आहे. त्यामुळे या तिघांनी माघार घेतली आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या वन डे मालिकेत मार्श व स्टॉयनिस यांच्या दुखापतीनं डोकं वर काढलं होतं. भारत दौऱ्यानंतर ऑस्ट्रेलिया घरच्या मैदानावर वेस्ट इंडिज व इंग्लंड यांच्याविरुद्ध ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे आणि त्यात वॉर्नर, मार्श व स्टॉयनिस खेळण्याची आशा आहे. भारत दौऱ्यावर स्टॉयनिसच्या अनुपस्थितीत अष्टपैलू टीम डेव्हिड याच्या पदार्पणाची शक्यता आहे. मार्शच्या अनुपस्थिती स्टीव्ह स्मिथ पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर खेळेल, तर कॅमेरून ग्रीन यालाही संधी मिळण्याची शक्यता आहे.  

एलिसने ट्वेंटी-२० ब्लास्टच्या फायनलमध्ये हॅम्पशायर संघाला नाट्यमयरित्या अखेरच्या षटकात १ धावेने विजय मिळवून दिला होता.  त्याने त्या लीगमध्ये १३ सामन्यांत ६.८७च्या इकॉनॉमीने १५ विकेट्स घेतल्या होत्या. हंड्रेड लीगमध्येही त्याने ७ विकेट्स घेतल्या. सॅम्सनेही ट्वेंटी-२० ब्लास्टमध्ये १२ सामन्यांत १४ विकेट्स घेतल् या आहेत आणि १६५ धावाही चोपल्या आहेत.  

ऑस्ट्रेलियाचा संघ - सीन एबॉट, अॅश्टन अॅगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, आरोन फिंच, कॅमेरून ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, डॅनिएल सॅम्स, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, अॅडम झम्पा. 

भारतीय संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह  

 वेळापत्रक  - २० सप्टेंबर- मोहाली, २३ सप्टेंबर - नागपूर व २५ सप्टेंबर- हैदराबाद

 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाडेव्हिड वॉर्नर
Open in App