India vs Australia T20I Series : ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी भारतीय खेळाडूंचा सराव व्हावा यासाठी BCCI ने ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेचे आयोजन केले. उद्यापासून भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या तीन ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडलेले खेळाडूच या मालिकेत खेळतील. या मालिकेपूर्वी दोन्ही संघांना धक्के बसले आहेत. भारताचा प्रमुख जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी ( Mohammed Shami)ला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने माघार घ्यावी लागली. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क, मिचेल मार्श व मार्कस स्टॉयनिस असे या स्टार खेळाडूंनी माघार घेतली आहे.
किती प्रश्न विचारतो तू? रोहित शर्मानं लाईव्ह पत्रकार परिषदेत उडवली खिल्ली, Video Viral
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत २३ ट्वेंटी-२० सामने खेळले गेले आणि त्यात भारताने १३-९ अशी आघाडीघेतली आहे. १ सामना अनिर्णीत राहिला. भारतात खेळलेल्या ७ पैकी ३ सामनेच ऑस्ट्रेलियाला जिंकता आले आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियालाही वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी या मालिकेत चांगली कामगिरी करून आत्मविश्वास उंचावण्याची संधी आहे. मिचेल स्टार्क, मिचेल मार्श व मार्कस स्टॉयनिस असे या स्टार खेळाडूंच्या जागी नॅथन एलिस, डॅनिएल सॅम्स व सीन एबॉट यांचा समावेश करण्यात आला आहे.स्टार्कला गुडघ्याची दुखापत, मार्शला पोटरीची दुखापत अन् स्टॉयनिसला पाठीच्या दुखापतीने त्रस्त केले आहे. त्यामुळे या तिघांनी माघार घेतली आहे.
भारताच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात राखीव खेळाडू म्हणून निवड झालेल्या शमीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याला माघार घ्यावी लागली आहे. १० महिन्यांनंतर भारताच्या ट्वेंटी-२० संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज असलेल्या शमीच्या मार्गात कोरोनाचे विघ्न आले. २५ सप्टेंबरला ही मालिका संपतेय व २८ पासून दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका सुरु होणार आहे. तो कितपत सावरतो यावर आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील त्याच्या सहभागाचा निर्णय घेतला जाईल. त्याला घरी ७ दिवस विलगिकरणात रहावे लागणार आहे. दोन कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच तो संघासोबत सराव करू शकेल. त्याच्या जागी उमेश यादव याची निवड झाली आहे.
भारतीय संघ -रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह
ऑस्ट्रेलियाचा संघ - सीन एबॉट, अॅश्टन अॅगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, आरोन फिंच, कॅमेरून ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, डॅनिएल सॅम्स, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, अॅडम झम्पा.
वेळापत्रक
- पहिली ट्वेंटी-२०- २० सप्टेंबर- मोहाली, सायंकाळी ७.३० वा.पासून
- दुसरी ट्वेंटी-२० - २३ सप्टेंबर- नागपूर, सायंकाळी ७.३० वा.पासून
- तिसरी ट्वेंटी-२० - २५ सप्टेंबर- हैदराबाद, सायंकाळी ७.३० वा.पासून
- थेट प्रक्षेपण - स्टार स्पोर्ट्स, डिस्नी हॉटस्टर, DD Sports