ICC Men's T20I Team Rankings : भारताने ट्वेंटी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियावर विजय मिळवून आयसीसी ट्वेंटी-२० संघाच्या क्रमवारीत अव्वल स्थानावरील पकड अधिक मजबूत केली आहे. विराट कोहली व सूर्यकुमार यादव यांच्या वादळी अर्धशतकांच्या जोरावर भारताने तिसऱ्या ट्वेंटी-२०त ऑस्ट्रेलियावर ६ विकेट्स राखून विजय मिळवला. भारताने हैदराबाद येथे झालेल्या सामन्यात विजय मिळवून तीन सामन्यांची मालिकाही २-१ अशी जिंकली. या विजयानंतर भारताच्या ICC Men's T20I Team Rankingsमधील खात्यात एक गुणाची भर पडली आणि ते आता इंग्लंडपासून आणखी पुढे गेले आहेत.
भारताच्या खात्यात २६८ रेटींग पॉईंट्स झाले असून दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडच्या खात्यात २६१ रेटींग पॉईंट्स आहेत. इंग्लंडला चौथ्या ट्वेंटी-२० सामन्यात पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. हॅरीस रॉफने सलग दोन विकेट्स घेत सामना फिरवला आणि त्यानंतर मॅथ्यू मोट रन आऊट झाल्याने पाकिस्ताने तो सामना जिंकून मालिका २-२ अशी बरोबरीत आणली. पाकिस्तान-इंग्लंड यांच्यात अजूनही तीन ट्वेंटी-२० सामने होणार आहेत आणि त्यानंतर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा आहे. भारतही घरच्या मैदानावर वर्ल्ड कपआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामने खळणार आहे. आफ्रिका व पाकिस्तान यांचे प्रत्येकी २५८ रेटींग पॉईंट्स आहेत आणि ते अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत.
पूर्णवेळ कर्णधार झाल्यानंतर रोहितचे मालिका विजय
वि. वि. न्यूझीलंड ३-० ट्वेंटी-२०वि. वि. वेस्ट इंडिज ३-० वन डेवि. वि. वेस्ट इंडिज ३-० ट्वेंटी-२०वि. वि. श्रीलंका ३-० ट्वेंटी-२०वि. वि. श्रीलंका २-० कसोटीवि. वि. इंग्लंड २-१ ट्वेंटी-२०वि. वि. इंग्लंड २-१ वन डेवि. वि. वेस्ट इंडिज ३-१ ट्वेंटी-२०
इंग्लंडचा संघ पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत एक सामना जिंकला तरीही दुसऱ्या क्रमांकावर कायम राहणार आहे. दक्षिण आफ्रिका भारताविरुद्ध तीन सामने जिंकून आगेकूच करू शकते. न्यूझीलंड २५२ पॉईंटसह पाचव्या क्रमांकावर आहे. वर्ल्ड कप स्पर्धेआधी न्यूझीलंड घरच्या मैदानावर पाकिस्तान व बांगलादेश यांच्याविरुद्ध प्रत्येकी ३ सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या खात्यातील एक गुण कमी झाला असून ते २५० पॉईंट्ससह सहाव्या क्रमांकावर आहेत. तेही वेस्ट इंडिज व इंग्लंड यांच्याविरुद्ध घरच्या मैदानावर ६ ट्वेंटी-२० सामने खेळणार आहेत.