IND vs AUS T20I : वन डे वर्ल्ड कप संपला.. भारतीय संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले... नरेंद्र मोदी स्टेडियमवरील फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने यजमान भारतावर विजय मिळवला. आता भारतीय संघ नव्या दमाने, तरुण खेळाडूंसह ऑस्ट्रेलियाविरुद्ध ट्वेंटी-२० मालिकेत मैदानावर उतरणार आहे. हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव ५ सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे. आज मालिकेतील पहिला सामना विशाखापट्टणम येथे होणार आहे आणि काल त्याआधी कर्णधार सूर्यकुमार यादव याची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत केवळ दोन पत्रकार पाहून सूर्यकुमारलाही आश्चर्य वाटले. वर्ल्ड कपमध्ये प्रत्येक पत्रकार परिषदेत किमान २०० पत्रकार दिसले होते आणि आज ही संख्या थेट २ वर आली.
या पत्रकार परिषदेत सूर्यकुमारने वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील अपयशाबद्दल निराशा व्यक्त केली. ''हे थोडे निराशाजनक आहे. पण, जेव्हा आपण प्रवासात मागे वळून पाहतो, तेव्हा ही खरोखरच एक उत्कृष्ट मोहीम होती. केवळ खेळाडूंनाच नाही संघातील प्रत्येक सदस्याला, संपूर्ण भारताला आमच्या कामगिरीचा अभिमान वाटत होता. आम्ही संपूर्ण स्पर्धेत खेळलो तो सकारात्मक क्रिकेटचा ब्रँड होता आणि आम्हाला याचा खरोखर अभिमान आहे,” असे सूर्यकुमार म्हणाला.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर तीन दिवसांत मैदानावर परतण्याच्या शक्यतेबद्दल विचारले असता, तो म्हणाला की त्याच्यासाठी आणि खेळाडूंसाठी हे सोपे काम होणार नाही, परंतु पुढे जावे लागेल."या पराभवाचे दुःख विसरण्यास थोडा वेळ लागेल. असे होत नाही की तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी उठता आणि जे काही घडले ते विसरून जा. साहजिकच आम्हाला जिंकायला आवडले असते. पण हा पराभव तुम्हाला विसरावा लागेल आणि पुढे जावे लागेल. ही एक नवीन टीम आहे, नवीन मुले आणि नवीन ऊर्जा. त्यामुळे आम्ही या मालिकेची वाट पाहत आहोत,” असे तो पुढे म्हणाला.
भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), ईशान किशन, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार.
ऑस्ट्रेलिया : मॅथ्यू वेड (कर्णधार), ॲरोन हार्डी, जेसन बेहरेनडोर्फ, सीन एबोट, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर सांघा, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टोइनिस, केन रिचर्डसन आणि ॲडम झम्पा.
मालिकेचे वेळापत्रक ( Schedule ) पहिली ट्वेंटी-२० - २३ नोव्हेंबर, विशाखापट्टणमदुसरी ट्वेंटी-२० - २६ नोव्हेंबर, तिरुअनंतपूरमतिसरी ट्वेंटी-२० - २८ नोव्हेंबर, गुवाहाटीचौथी ट्वेंटी-२० - १ डिसेंबर, नागपूरपाचवी ट्वेंटी-२० ३ डिसेंबर, हैदराबाद