Team India, IND vs AUS 2nd Test: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा दुसरा कसोटी सामना खेळण्यासाठी टीम इंडिया दिल्लीत आहे. मात्र, यावेळी दिल्लीत पोहोचल्यानंतर टीम इंडियाचे हॉटेल बदलण्यात आले आहे. नागपुरातून पहिली कसोटी जिंकून भारताने ४ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता भारतीय संघ दिल्लीत आपली आघाडी २-० अशी वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी टीम इंडियाची तयारी जोरात सुरू आहे. आधीच दिल्लीतील कसोटीसाठी खेळवण्यात येणाऱ्या पिचवरून ऑस्ट्रेलियन मीडियाची बोंबाबोंब सुरू आहे. असे असतानाच भारतीय संघाचे हॉटेल बदलण्यात आले आहे. या बदलाची २ कारणे असल्याचे बोलले जात आहे.
टीम इंडियाचे हॉटेल का बदलण्यात आले त्याचे कारण आपण जाणून घेऊया. सहसा, टीम जेव्हा दिल्लीत राहायची तेव्हा त्यांच्यासाठी आयटीसी मौर्य किंवा ताज पॅलेस हॉटेल्स बुक केली जायची. पण पीटीआयच्या म्हणण्यानुसार, यावेळी भारतीय संघ या दोनपैकी एकाही हॉटेलमध्ये थांबलेला नाही. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, यावेळी टीम इंडियाच्या खेळाडूंना नोएडा येथील हॉटेल लीलामध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. संघ हॉटेलमधील या बदलाची दोन कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे G20 परिषद आणि दुसरे कारण म्हणजे लग्नाचा हंगाम. या दोन कारणांमुळे दिल्लीतील ताज पॅलेस आणि आयटीसी मौर्या हॉटेलवर मोठा भार आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या मुक्कामाच्या हॉटेलमध्ये बदल करण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.
विराट कोहली वगळता संघाचे सर्व खेळाडू सध्या तिथेच थांबले आहेत. पीटीआयनुसार, विराट कोहली आज टीम हॉटेलमध्ये चेक इन करू शकतो. सध्या ते गुरुग्राम येथील त्याच्या घरी राहत आहे. त्याने यासाठी संघ व्यवस्थापनाची विशेष परवानगी घेतली होती. पण, आता तो संघासोबत हॉटेलमध्ये सहकारी खेळाडूंसोबत सहभागी होणार आहे.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, हॉटेल लीला येथील व्यवस्थेवर बोर्ड खूश आहे. ते म्हणाले, “हॉटेल अप्रतिम आहे. येथील सुविधाही प्रचंड चांगल्या आहेत. खूप विचार करून हॉटेल शिफ्ट करायचं ठरवण्यात आले आहे." दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा दुसरा सामना शुक्रवार, १७ फेब्रुवारीपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.