IPL 2023 नंतर लगेचच, भारत आणि ऑस्ट्रेलिया जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या विजेतेपदाच्या सामन्यात भिडणार आहेत. टी-20 च्या व्यस्त वेळापत्रकानंतर कसोटी खेळणे थोडे कठीण जाईल, परंतु एवढी मोठी स्पर्धा जिंकण्यासाठी भारतीय संघाच्या खेळाडूंनी खास योजना आखली होती. आयपीएलच्या वेळीच हा प्रकार घडला होता. या संदर्भात भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने मोठा खुलासा केला. IPL सुरू असतानाच ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनल संबंधीचा एक मास्टरप्लॅन भारतीय खेळाडूंनी तयार केला होता.
भारताचा 'मास्टरप्लॅन'
भारत दुहेरी आव्हानासाठी सज्ज आहे. भारतीय संघाने इंग्लंडमध्ये वापरल्या जाणार्या ड्यूक्स चेंडूंशी ताळमेळ साधण्याचे काम केले आहे. अक्षरने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) सांगितले, "आम्हाला याची माहिती आयपीएल सुरू होण्यापूर्वीच होती, त्यामुळे आयपीएलदरम्यानही याबाबत चर्चा झाली. आमच्याकडे लाल चेंडू होते म्हणून आम्ही ते वापरत होतो. केव्हा आणि कसे खेळायचे, किती वेळ आहे हे आम्हाला माहीत होते. त्यातही पांढऱ्या चेंडूने टी२० खेळत असताना लाल चेंडूने टेस्टची मानसिकता आणणे साहजिकच अवघड होते, पण आम्हाला पुरेसा वेळ मिळाला."
"चेंडू कोणताही असो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य लाइन आणि लेंग्थवर गोलंदाजी करण्यावर भर देणे. आम्ही आता पांढऱ्या चेंडूवरून लाल चेंडूचे क्रिकेट खेळणार आहोत. हे एसजीचे चेंडू ड्यूक्स बॉलमध्ये बदलण्यासारखे आहे. तुम्हाला तुमची प्रतिभा आणि कौशल्य वापरावे लागेल. तुम्हाला तुमची योजना अंमलात आणावी लागेल आणि तुमच्या गोलंदाजीची लय शोधावी लागेल. चेंडू कोणताही असो, जर तुम्ही योग्य टप्प्यात गोलंदाजी केलीत तर ते तुमच्या नक्की कामी येईल. सामना इंग्लंडमध्ये आहे, तिथली परिस्थिती भारतापेक्षा वेगळी आहे, त्यामुळे येथे कोणत्या टप्प्यावर चेंडू टाकल्याने उत्तम परिणाम मिळेल याचे आम्ही प्लॅनिंग करत आहोत," असे तो म्हणाला.