IND vs AUS, Team India Playing XI : भारतीय संघाने नागपूर कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. रोहित शर्माचे शतक, रवींद्र जडेजाची अष्टपैलू कामगिरी, अक्षर पटेलची दमदार फलंदाजी आणि आर अश्विनची फिरकी, याच्या जोरावर भारताने पहिली कसोटीत एक डाव व १३२ धावांनी ही कसोटी जिंकली. आता दुसऱ्या कसोटीपूर्वी श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) पूर्णपणे तंदुरूस्त होऊन मैदानावर परतला आहे आणि त्याच्या येण्याचे सूर्यकुमार यादवचे प्लेइंग इलेव्हनमधील स्थान धोक्यात आले आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) याने तसे संकेत दिले आहेत.
माझ्यापेक्षा दुसरा कुणीतरी...! वन डे संघातून वगळण्यावर शिखर धवन प्रथमच व्यक्त झाला, निवृत्तीची चर्चा
दुखापतीमुळे श्रेयस अय्यरला नागपूर कसोटीत खेळता आले नव्हते आणि तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत उपचारासाठी दाखल झाला होता. आता तो पूर्णपणे फिट होऊन १७ फेब्रुवारीपासून दिल्ली येथे होणाऱ्या कसोटीसाठी संघात परतला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन वन डे सामन्यांच्या मालिकेलाही अय्यरला मुकावे लागले होते. नागपूर कसोटीत अय्यरच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवने कसोटीत पदार्पण केले आणि त्याला केवळ ८ धावाच करता आल्या. त्यात राहुल द्रविडच्या विधानाने सूर्याची दुसऱ्या कसोटीतून प्लेइंग इलेव्हनमधून गच्छंती निश्चित मानली जात आहे.अय्यरने नेट्समध्ये फलंदाजीचा सराव केला आणि संघ व्यवस्थापनाला तो पाच दिवस खेळू शकेल याची खात्री पटल्यास त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रवेश केला जाईल, असे द्रविडने स्पष्ट केले.
''दुखापतीतून बरं होऊन परतलेल्या खेळाडूला पाहून नेहमी चांगले वाटते. दुखपातीमुळे आम्हाला कोणत्याही खेळाडूला गमवायचे नाही. संघ म्हणून हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. अय्यर आल्याने मला आनंद झालाय आणि त्याच्याबातचा निर्णय काही सराव सत्रानंतर घेतला जाईल. आज त्याने खूप काळ सराव केला. उद्या त्याच्यावर लक्ष ठेवले जाईल आणि तो जर फिट असेल तर त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाईल,''असे द्रविड म्हणाला.
अय्यरने वन डे व कसोटी क्रिकेटमध्ये मागील दीड वर्षांत चांगली कामगिरी केली आहे. त्याने ७ कसोटींत ६२४ धावा केल्या आहेत. द्रविड पुढे म्हणाला,''अय्यर फिरकीपटूंना चांगला खेळतो. कानपूर कसोटीतील पदार्पणापासून आम्ही आव्हानात्मक परिस्थितीत त्याचा खेळ आम्ही पाहिला आहे.''