IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका आता शेवटच्या टप्प्यात आहे. भारताने या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. तर चौथ्या कसोटी सामन्याची परिस्थिती पाहता, हा सामना अनिर्णित राहण्याची शक्यताच अधिक दिसत आहे. चार दिवसांचा खेळ संपला असून त्यात, ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४८० तर भारताने पहिल्या डावात ५७१ धावा केल्या. कसोटी मालिका भारताने जिंकल्यास भारताचा विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे भारतासाठी ही कसोटी मालिका महत्त्वाची आहे. कसोटी मालिकेनंतर लगेचच भारत ऑस्ट्रेलियाशी वन डे मालिकाही खेळणार आहे. या वन डे मालिकेआधीच भारतासाठी एक वाईट बातमी आहे.
भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर याच्याबद्दल एक महत्त्वाची अपडेट आली आहे. ऑस्ट्रेलिया विरूद्ध होणाऱ्या आगामी वन डे मालिकेत श्रेयस अय्यरच्या खेळण्याबाबत साशंकता आहे. चौथ्या कसोटी सामन्यातदेखील श्रेयस अय्यर पहिल्या डावात फलंदाजीसाठी येऊ शकला नव्हता. श्रेयस अय्यरच्या पाठीच्या दुखण्याने उचल खाल्ली असून त्यामुळे त्याला फारशी हालचाल करता येत नसल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्याची त्याची परिस्थिती पाहता, तो IPL खेळू शकेल की नाही याबद्दलही साशंकता आहे. श्रेयस अय्यरची वैद्यकीय चाचणी झाल्यानंतरच, त्याच्या वन डे मालिकेतील आणि IPL मधील समावेशाबाबत निर्णय घेतला जाणार आहे, असे सांगण्यात आले आहे.
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर श्रेयस अय्यरने आपल्या दुखापतीबद्दल BCCI च्या वैद्यकीय टीमला माहिती दिली. त्यानंतर त्याला रूग्णालयात पाठवण्यात आले. त्याचे काही स्कॅन्स करण्यात आले. त्यानंतर आता BCCI ची मेडिकल टीम त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अय्यरचे रिपोट्स पाहता त्याला एका तज्ज्ञ डॉक्टरचा सल्ला घेणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. तसेच, त्याची दुखापत काही अंशी गंभीर असल्याचेही दिसत आहे. त्यामुळे त्याला वन डे मालिकेत खेळता येणार नाही असे मानले जात आहे. त्याच्या जागी कोणत्या खेळाडूचा समावेश होईल याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. पण BCCI ने अद्याप अशी कोणतीही घोषणा केलेली नाही.