नवी दिल्ली ।
भारतीय संघासाठी ऑक्टोंबर-नोव्हेंबरमध्ये सुरू होणारा टी-२० विश्वचषक खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण संघाने मागील ९ वर्षांपासून टीम इंडियाला ICC ची एकही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. याशिवाय गेल्या विश्वचषकात देखील संघाची कामगिरी निराशाजनक राहिली होती आणि संघाला पहिल्याच फेरीत स्पर्धेबाहेर जावे लागले होते. मात्र आता संघाला नवीन कर्णधार मिळाला आहे. त्यामुळे नव्या जोमाने संघाची वाटचाल सुरू आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंडविरूद्धची एकदिवसीय मालिका खेळत आहे. विश्वचषकासाठी संघ तयार करण्यासाठी BCCI ऑस्ट्रेलियाविरूद्ध मालिका खेळण्याच्या तयारीत आहे. कांगारूचा संघ भारताच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे.
क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, सप्टेंबर-ऑक्टोंबर दरम्यान ऑस्ट्रेलियन संघ भारत दौऱ्यावर येऊ शकतो. ३ टी-२० आणि ३ एकदिवसीय अशा ६ सामन्यांचा या दौऱ्यामध्ये समावेश असू शकतो. मात्र विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर एकदिवसीय सामन्यांच्या आयोजनाबाबत अद्याप संभ्रम असून ठोस निर्णय झालेला नाही. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियन संघ सध्या टी२० विश्वचषकाचा चॅम्पियन आहे. याशिवाय पुढील वर्षी ऑस्ट्रेलियाच्या संघाला ४ कसोटी सामन्यांसाठी भारताच्या दौऱ्यावर यायचे आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा एक भाग आहे आणि दोन्हीही संघासाठी हे सामने अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेत छोटा बदल
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होणारी गावस्कर बॉर्डर ट्रॉफीमध्ये आता ४ ऐवजी ५ सामने खेळवले जाण्याची दाट शक्यता आहे. २०२४ पासून सुरू होणाऱ्या नवीन फ्यूचर टूर प्रोग्राममध्ये याचा समावेश करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या या मालिकेत ४ सामने खेळवले जातात. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ ने म्हटले आहे की, हा एक चांगला निर्णय आहे, ॲशेस मालिकेप्रमाणे इथे देखील जबरदस्त सामने पाहायला मिळतील. वॉ ने भारताविरूद्ध ७ कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील तीन सामन्यांमध्ये त्याने कांगारूच्या संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती.