India vs Australia Pink Ball Day Night Test, IND vs AUS: टीम इंडियाला यावर्षी नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे आहे. जवळपास २ महिन्यांच्या या दौऱ्यात दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. यंदा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही संघांमध्ये ५ सामने होणार आहेत. त्यामध्ये दिवस-रात्र कसोटी सामन्याचाही समावेश असणार आहे. हा डे-नाईट सामना ॲडलेड ओव्हल येथे ६ ते १० डिसेंबर दरम्यान खेळवला जाईल. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या याआधी खेळलेल्या डे-नाईट कसोटीत भारताची कामगिरी खूपच खराब झाली होती. पण यावेळी टीम इंडियाची आणि प्रामुख्याने गौतम गंभीरची खास परीक्षा असणार आहे. त्यामुळे या मालिकेबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला गेला आहे.
डे-नाईट टेस्टसाठी टीम इंडियाची खास योजना
२०२०-२१च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर टीम इंडिया प्रथमच कसोटी मालिकेसाठी जाणार आहे. मात्र गेल्या दौऱ्यावर दिवस-रात्र कसोटीत भारतीय संघाची कामगिरी अत्यंत खराब झाली होती. ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात २४४ धावा केल्या होत्या. सामन्याची चांगली सुरुवात झाल्यावर भारतीय गोलंदाजांनीही ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात १९१ धावांत रोखले होते. मात्र दुसऱ्या डावात संपूर्ण भारतीय संघ २१.२ षटकांत ३६ धावांवर गडगडला होता. यावेळी ऑस्ट्रेलियात अशी चूक होऊ नये म्हणून टीम इंडियाने या कसोटीपूर्वी एक दोन दिवसीय डे-नाईट सराव सामना खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
असा असेल सामन्याचा कार्यक्रम
टीम इंडिया ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान कॅनबेरा येथे दिवस-रात्र सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या PM 11 विरुद्ध खेळणार आहे. टीम इंडियाने गेल्या २ वर्षांपासून एकही दिवस-रात्र कसोटी खेळलेली नाही, त्यामुळे हा सराव सामना भारतीय खेळाडूंच्या तयारीसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. ही मालिका गौतम गंभीरच्या कार्यकाळातील पहिली कसोटी मालिका असेल, जी भारताबाहेर खेळवली जाणार आहे. त्यामुळे त्याचाही कोच म्हणून कस लागणार आहे.
- भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे वेळापत्रक
- पहिली कसोटी: २२-२६ नोव्हेंबर, पर्थ
- दुसरी कसोटी: ६-१० डिसेंबर, ॲडलेड (दिवस-रात्र)
- तिसरी कसोटी: १४-१८ डिसेंबर, ब्रिस्बेन
- चौथी कसोटी: २६-३० डिसेंबर, मेलबर्न
- पाचवी कसोटी: ३-७ जानेवारी, सिडनी