Join us  

IND vs AUS Test : ऐतिहासिक विजयानंतर रवी शास्त्रींचा 'क्रिकेटच्या देवा'ला अप्रत्यक्ष टोला

IND vs AUS Test: भारतीय संघाने 2019ची दणक्यात सुरुवात केली. भारताने प्रथमच ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या प्रेक्षकांसमोर नमवण्याचा पराक्रम केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2019 9:56 AM

Open in App
ठळक मुद्देमुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा तेंडुलकरला टोलादिग्गजांची फौज असलेल्या संघाला जमलं नाही ते या संघाने केलं1983च्या वर्ल्ड कपपेक्षा हा विजय मोठा

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाने 2019ची दणक्यात सुरुवात केली. भारताने प्रथमच ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या प्रेक्षकांसमोर नमवण्याचा पराक्रम केला. भारताच्या या ऐतिहासिक कामगिरीचे जगभरातून कौतुक झाले. त्यामुळे संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे हवेत तरंगू लागले. सिडनी कसोटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भारताच्या याआधीच्या संघांबद्दल एक विधान केलं. त्यांनी क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकरला नाव न घेता टोमणाही मारला. 

1990 ते 2000 या कालावधीत भारतीय संघात तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, अनिल कुंबळे आदी दिग्गज खेळाडू होते. मात्र, या दिग्गजांना ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. शास्त्री म्हणाले,''या संघात कुणी देव नाही आणि संघात कुणीही वरिष्ठ किंवा कनिष्ठ नाही. हा असा संघ आहे की जो कुठेही जाऊन देशाला विजय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. हाच त्यांचा निर्धार आहे. याच मानसिकतेने संघ ऑस्ट्रेलियात खेळला आणि त्यामुळेच या खेळाडूंचा अभिमान वाटतो.'' 'देव' असा उल्लेख करून शास्त्रींनी माजी संघ आणि तेंडुलकरसारख्या दिग्गज खेळाडूंवर टीका केली. शास्त्री पुढे म्हणाले,'' या संघाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आम्ही सर्वोत्तम कसोटी क्रिकेट खेळलो, असे हा संघ भारताच्या पूर्वीच्या संघातील खेळाडूंच्या डोळ्यांत डोळे टाकून छातीठोक सांगू शकतो.''

शास्त्री म्हणाले की,''हा निकाल माझ्यासाठी खूप समाधानकारक आहे. माझ्यासाठी 1983 चा वर्ल्ड कप आणि 1985 ची वर्ल्ड चॅम्पियनशीप यापेक्षाही हा मालिका विजय मोठा आहे. हे कसोटी क्रिकेट आहे आणि क्रिकेटचा खरा कस या प्रकारात लागतो.'' 

टॅग्स :रवी शास्त्रीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियासचिन तेंडुलकरबीसीसीआय