ठळक मुद्देभारताचा तिसऱ्या कसोटीत 137 धावांनी विजययजमान ऑस्ट्रेलिया मालिकेत 1-2 ने पिछाडीवरचौथ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात नवा खेळाडू
मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : बॉक्सिंग डे कसोटीनंतर यजमान ऑस्ट्रेलियानं रडगाणं सुरू केले आहे. मेलबर्नची खेळपट्टी ही भारतीय गोलंदाजांसाठी उपयुक्त असल्याचा साक्षात्कार ऑसी कर्णधार टीम पेनला झाला आणि त्याने तसं मत व्यक्त करून पराभवाचं खापर खेळपट्टीवर फोडलं. पण, भारताच्या या विजयानंतर ऑस्ट्रेलियन संघ चांगलाच घाबरला आहे आणि मालिका वाचवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर उभे राहिले आहे. त्यामुळे सिडनी कसोटीत त्यांना स्वतःला झोकून खेळ करावा लागणार आहे. भारतीय संघाची धास्ती घेतलेल्या कांगारूंनी चौथ्या कसोटीसाठी संघात नव्या भिडूचा समावेश केला आहे.भारताने तिसऱ्या कसोटीत यजमानांसमोर विजयासाठी 399 धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 261 धावांवर माघारी परतला आणि भारताने 137 धावांनी विजय साजरा केला. भारताने चार सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियात त्यांच्याचविरुद्ध मालिकेत 2-1 अशी आघाडी घेणारा कोहली हा आशियातील पहिलाच कर्णधार ठरला. त्यामुळे यजमानांची मालिका वाचविण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. मेलबर्न कसोटी संपताच ऑस्ट्रेलियाने चौथ्या सामन्यासाठी संघ जाहीर केला. 3 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या सामन्यात त्यांनी संघात नवा भिडू घेतला आहे. मार्नस लॅबसचॅग्ने असे त्या भिडूचे नाव आहे. सिडनीची खेळपट्टी ही फिरकीपटूंना साथ देणारी असल्याने लॅबसचॅग्नेला संघात स्थान देण्यात आले आहे. लॅबसचॅग्ने हा अष्टपैलू खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणाला,''सिडनीची खेळपट्टी ही फिरकीला साथ देणारी आहे. त्यामुळे एक अतिरिक्त फिरकीपटूचा समावेश आम्ही संघात केला आहे. अंतिम अकरा खेळाडूंचा निर्णय सामन्याच्या दिवशी घेतला जाईल.'' लॅबसचॅग्नेने पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत पदार्पण केले आणि त्याने दोन सामन्यांत 71 धावा केल्या व 7 विकेट घेतल्या. मात्र, त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले होते.
लॅबसचॅग्नेच्या समावेशामुळे मिचेल मार्शला संघाबाहेर बसावे लागू शकते. मेलबर्न कसोटी मार्शने केवळ 19 धावा केल्या आणि त्याला एकही विकेट घेता आला नाही. भारतीय संघही या सामन्यात दोन फिरकीपटूंसह खेळण्याची शक्यता आहे, रवींद्र जडेजा आणि आर अश्विन ही जोडी सिडनीत दिसू शकते. पण, अश्विन तंदुरुस्त न झाल्यास कुलदीप यादव खेळू शकतो.
ऑस्ट्रेलियाचा संघ : टीम पेन, जोश हेझलवुड, मिचेल मार्श, पॅट कमिन्स, अॅरोन फिंच, पीटर हॅण्ड्सकोम्ब, मार्कस हॅरीस, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, नॅथन लियॉन, शॉन मार्श, पीटर सिडल, मिचेल स्टार्क, मार्नस लॅबसचॅग्ने.