मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : परदेशी खेळपट्टीवर भारताच्या सलामीच्या जोडीला सातत्याने अपयश येत आहे. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड पाठोपाठ ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही याची प्रचिती येत आहे. मुरली विजय आणि लोकेश राहुल ही जोडी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत सपशेल अपयश आले. पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाने विजय मिळवून मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. त्यामुळे बॉक्सिंग डे कसोटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या कसोटीपूर्वी सलामीचे जोडी कोण, हा यक्ष प्रश्न कर्णधार विराट कोहली समोर आहे. भारताचा हा सलामीचा गुंता काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरूर यांनी सोडवला आहे. त्यांनी मेलबर्न कसोटीसाठी सलामीची जोडी सांगितली आहे.
पृथ्वी शॉ जायंबद झाल्यामुळे भारताच्या सलामीची चिंता आणखी वाढली आहे. त्यात उर्वरीत दोन कसोटींसाठी मयांक अग्रवाल आणि हार्दिक पांड्या यांना संघात सहभागी करण्यात आले आहे. मयांकच्या समावेशामुळे सलामीसाठी एक पर्याय मिळाला आहे. पण कोहलीची कृपा त्याच्यावर होइलच अशी नाही. त्यामुळे विजय आणि राहुल हीच जोडी तिसऱ्या कसोटीतही दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. पण तरीही माजी खेळाडू अनेक पर्याय सुचवत आहेत. त्यात थरूर यांचीही भर पडली आहे.
विजय आणि राहुल यांना या कसोटी मालिकेत दोन सामन्यांत अनुक्रमे 49 व 48 धावा करता आल्या आहेत. 27 वर्षीय मयांकला संधी मिळावी अशी अनेकांची अपेक्षा आहे. थरूर यांनाही मयांक सलामीला हवा आहे, पण त्यांनी त्याच्यासोबत आर अश्विनला पाठवा असा सल्ला दिला आहे. थरूर यांनी तिसऱ्या कसोटीसाठी मयांक आणि अश्विन ही जोडी सुचवली आहे.