IND vs AUS Test: ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर आणि तडाखेबाज फलंदाज यष्टीरक्षक अडम गिलख्रिस्ट (Adam Gilchrist) याने आगामी भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेबाबत एक भविष्यवाणी केली आहे. बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका (Border Gavaskar Trophy) पुढील महिन्यापासून भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND v AUS) यांच्यात सुरू होणार आहे. या कसोटी मालिकेत चार सामने खेळवले जाणार आहेत. त्यासाठी ऑस्ट्रेलियन संघही पूर्णपणे सज्ज आहे. ऑस्ट्रेलियाने भारतीय भूमीवर शेवटची कसोटी मालिका २००४ मध्ये जिंकली होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार अॅडम गिलख्रिस्ट होता. त्याने ४ कसोटी मालिकेत टीम इंडियाचा २-१ ने पराभव केला होता. त्यामुळे, अडम गिलख्रिस्टने आगामी कसोटी मालिकेसाठीही सध्याच्या ऑस्ट्रेलिया संघाला एक खास सल्ला दिला आहे आणि आपला अनुभव शेअर केला आहे.
फॉक्स स्पोर्ट्सशी बोलताना माजी यष्टीरक्षक फलंदाज अडम गिलख्रिस्ट या संदर्भात म्हणाला, "मी संघाचा कर्णधार असताना आम्ही आमची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न केला आणि ऑस्ट्रेलियन संघ यावेळीही तेच करतो की नाही हे पाहण्यात मला रस आहे. भारत दौऱ्यावर ऑस्ट्रेलियाच्या संघाने फारसा विचार करण्यात अर्थ नाही. फक्त त्यांनी फिरकी गोलंदाज बदलत राहिले पाहिजेत. पहिल्याच चेंडूपासून गोलंदाजांनी स्टंपवर हल्ला केला पाहिजे. आपला आक्रमकपणा थोडा कमी करा आणि दुसऱ्यावर आक्रमण करण्यासाठी बचावात्मक मार्गाने खेळा असा माझा सल्ला असेल. गोलंदाजी करतानाही स्लिपने सुरुवात करा, मिड-विकेटवर झेल घेण्यापासून सुरुवात करा परंतु शॉर्ट कव्हर किंवा शॉर्ट मिड-विकेटवर खेळाडू ठेवा आणि धीर धरा. सगळं बरोबर जमून येईल."
ऑस्ट्रेलिया यावेळी भारतात कसोटी मालिका जिंकेल; गिलख्रिस्टला विश्वास
अडम गिलख्रिस्टला यावेळी ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका जिंकू शकेल, अशी आशा आहे. "ऑस्ट्रेलिया संघ मालिका जिंकेल असे मला वाटते. मला वाटते की त्यांच्याकडे एक जबरदस्त संघ आणि प्लेइंग इलेव्हन आहे. २००४ मध्ये आम्ही ज्या संघासोबत आलो होतो आणि आताचा संघ यात खूप साम्य आहे."
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना ९ फेब्रुवारीपासून नागपुरात सुरू होणार आहे.
भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ- पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार, ॲश्टन आगर, स्कॉट बोलंड, ॲलेक्स कॅरी, डेव्हिड वॉर्नर, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवुड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन.
ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा
९ ते १३ फेब्रुवारी, पहिला कसोटी सामना, नागपूर१७ ते २१ फ्रेब्रुवारी, दुसरा कसोटी सामना, दिल्ली१ ते ५ मार्च, तिसरा कसोटी सामना, धर्मशाला९ ते १३ मार्च, चौथा कसोटी सामना, अहमदाबाद