ind vs aus test | नागपूर : सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. आजपासून या मालिकेतील पहिला सामना नागपुरात खेळवला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची भारतीय गोलंदाजांनी कंबर मोडली. भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक 5 बळी घेतले. तर रविचंद्रन अश्विनला 3 बळी घेण्यात यश आले.
भारतीय संघात मोठ्या कालावाधीनंतर पुनरागमन केलेल्या जडेजाने कांगारूच्या संघाला मोठे धक्के दिले. रवींद्र जडेजाने पहिल्या सामन्याच्या पहिल्याच डावात 22 षटकांत 47 धावा देऊन 5 बळी घेत भारतीय चाहत्यांची मने जिंकली आहेत. ज्यानंतर 'सर जडेजा' सोशल मीडियावर हिरो झाला आहे. पाहुण्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने आपल्या पहिल्या डावात 63.5 षटकांत 177 धावा केल्या. भारताकडून जडेजाने (5), अश्विनने (3) तर मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतले.
पहिल्या दिवसाअखेर भारत मजबूत स्थितीत
कांगारूच्या संघाकडून मार्नस लाबूशेनने सर्वाधिक 49 धावांची खेळी केली. तर स्टीव्ह स्मिथ 37 धावांची साजेशी खेळी करून तंबूत परतला. लक्षणीय बाब म्हणजे लाबूशेन आणि स्मिथ या दोघांनाही रवींद्र जडेजाने बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर भारतीय संघाने आपल्या डावाची शानदार सुरूवात केली. पहिल्या दिवसाअखेर 24 षटकांत यजमान भारताने 1 बाद 77 धावा केल्या आहेत. कर्णधार रोहित शर्मा (56) आणि रविचंद्रन अश्विन (०) नाबाद खेळपट्टीवर टिकून आहेत. तर लोकेश राहुल (20) धावा करून तंबूत परतला. त्याला टॉड मुर्फीने बाहेरचा रस्ता दाखवला.
भारताकडून हिरो ठरलेल्या जडेजाने आपल्या यशाचे रहस्य उघड केले आहे. रवींद्र जडेजाने प्रेझेंटेशनदरम्यान म्हटले, "मी एनसीएमध्ये दररोज 10-12 तास गोलंदाजी करत होतो. मी माझ्या फिरकीवर विशेष काम करत होतो कारण मला माहित होते की मला लांबपर्यंत स्पेल टाकायचे आहेत." पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर जडेजाने माध्यमांशी संवाद साधला ज्याचा व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे. "मी सामन्याआधी खूप तयारी करत होतो. हातातून चेंडू बरोबर जात होता. लाईन लेन्थ चांगली होती. मला माहिती होते या खेळपट्टीवर बाउन्स नाही त्या हिशोबाने गोलंदाजी केली. त्यामुळेच मला बोल्ड आणि एलबीडब्ल्यूच्या माध्यमातून बळी घेता आले", असे जडेजाने आजच्या पुनरागमनाबद्दल सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: ind vs aus test I was bowling 10-12 hours everyday at the NCA said that ravindra jadeja after today's fantastic spell
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.