सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वर्चस्व गाजवले आहे आणि कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. मेलबर्नवर झालेल्या कसोटीत जसप्रीत बुमराने आपल्या वैविध्यपूर्ण गोलंदाजीने भारताला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. मेलबर्न कसोटीत 9 विकेट घेणाऱ्या बुमराला मॅन ऑफ दी मॅचच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. त्याच्या कामगिरीचे क्रिकेट वर्तुळातही भरभरून कौतुक झालं. बुमराने या कसोटीत भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांचा विक्रम मोडला होता. त्याच्या या कामगिरीचे कपिल देव यांनीही कौतुक केलं आहे आणि बुमराबद्दल त्यांनी यापूर्वी व्यक्त केलेलं मत चुकीचं असल्याची कबुली दिली.
बुमराच्या गोलंदाजीची शैली पाहून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फार काही करू शकेल असे कपिल देव यांना वाटले नव्हते. पण, त्यांचे मत बदलले आहे. ते म्हणाले,''बुमराने मला चुकीचे सिद्ध केले. त्याला पहिल्यांदा पाहिले त्यावेळी तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फार काही करू शकेल असे वाटले नव्हते. पण, तो अप्रतिम गोलंदाज आहे आणि ऑस्ट्रेलियातील त्याच्या कामगिरीचे कौतुक करावे तितके कमी आहे.''
भारताने 1981 मध्ये मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते आणि त्या सामन्यात कपिल देवने 28 धावा देत 5 विकेट घेतल्या होत्या. बुमराने बॉक्सिंग डे कसोटीत 9 विकेट घेतल्या आणि 37 वर्षांनी भारतीय संघाने मेलबर्नवर विजय मिळवला. कपिल म्हणाले,''बुमरा कमाल आहे. छोटे रन अप घेऊनही तो सातत्याने 140 च्या गतीने चेंडू टाकतो. त्याच्याकडे स्पेशल शोल्डर आहे असंच म्हणावं लागेल. असे गोलंदाज विशेष असतात. बुमरा नव्या व जुन्या चेंडूनेही कमालीची गोलंदाजी करतो. त्याचा बाऊंसर मारा प्रतिस्पर्धी खेळाडूंना हैराण करून सोडतो.''
कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने वर्ल्ड कप जिंकला होता. ते म्हणाले,''बुमराप्रमाणे श्रीनाथही अल्प कालावधीत छाप पाडण्यात यशस्वी झाला होता. जहीर खानने थोडा वेळ घेतला. जलदगती गोलंदाज चांगली कामगिरी करतो तेव्हा संघासाठी ते महत्त्वाचे ठरते."