Join us  

Setback to Australia, IND vs AUS Test: ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेतून स्टार खेळाडूची माघार

Big Blow to Australia, IND vs AUS Test: मणक्याच्या दुखापतीमुळे शस्त्रक्रिया करावी लागणार, ६ महिने क्रिकेटपासून दूर राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 3:55 PM

Open in App

Big Blow to Australia, IND vs AUS Test: भारतीय संघ प्रतिष्ठेची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) खेळायला नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. २२ नोव्हेंबर ते ७ जानेवारी असा तब्बल प्रदीर्घ काळ हा दौरा सुरु असणार आहे. भारतीय संघाची नुकतीच बांगलादेशविरूद्धची मालिका संपली. आता भारतीय संघ आधी न्यूझीलंड विरूद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका ही कायमच चर्चेचा विषय असते कारण दोन्ही संघांमध्ये 'काँटे की टक्कर' पाहायला मिळते. पण यावेळी मालिकेला अजून महिन्याभराचा कालावधी शिल्लक असतानाच ऑस्ट्रेलियाला  एक मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू कॅमेरॉन ग्रीन ( Cameron Green ) याने या मालिकेतून माघार घेतली आहे.

ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीनच्या मणक्याच्या हाडावर भार येत असल्याने फ्रॅक्चर झाले आहे. या आठवड्यात त्याच्या मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शस्त्रक्रियेची माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सोमवारी दिली. पाठदुखीमुळे तो इंग्लंड दौऱ्यावरून लवकर मायदेशी परतला होता. यानंतर, काही चाचण्या आणि स्कॅन करण्यात आले, ज्यावरून असे दिसून आले की त्याला लवकरात लवकर ही शस्त्रक्रिया आवश्यक आहे. वेगवान गोलंदाजांसाठी मणक्यामध्ये तणाव आणि फ्रॅक्चर येणे ही बाब धोक्याची असते. त्यामुळे दुखापतीचा धोका कमी करण्यासाठी त्याला लवकर शस्त्रक्रिया करुन घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

मणक्याच्या तणावामुळे झालेल्या फ्रॅक्चरवर शस्त्रक्रिया करण्याची वेळ अनेक वेगवान गोलंदाजांवर आली आहे. अशा शस्त्रक्रियेचा जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांना कमबॅकसाठी फायदाही झालेला आहे. अशा परिस्थितीत तो कॅमेरॉन ग्रीनसाठीदेखील ही शस्त्रक्रिया फायदेशीर ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या शस्त्रक्रियेमुळे कॅमेरून ग्रीनला पूर्णपणे तंदुरूस्त होऊन मैदानात परतायला सुमारे ६ महिने लागू शकतात. त्यामुळेच ग्रीनला पाच सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (BGT) कसोटी मालिकेतूनही माघार घ्यावी लागली आहे.

मोहम्मद शमीही दुखापतग्रस्त

मिळालेल्या वृत्तानुसार, शमी कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. NCA मध्ये पुनर्वसनाच्या कालावधीत शमीच्या गुडघ्याला सूज आली. त्यामुळे तो पुढील ६-८ आठवडे मैदानाबाहेर राहू शकतो. नोव्हेंबर २०२३च्या विश्वचषक फायनलनंतर शमीने एकही सामना खेळलेला नाही. डिसेंबर २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या दौऱ्यासाठी त्याची निवड झाली होती, परंतु BCCIच्या वैद्यकीय समितीने मंजुरी न दिल्याने त्याला या दौऱ्यातून माघार घ्यावी लागली होती.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलियासुनील गावसकरसीमारेषा