Rohit Sharma Captaincy, IND vs AUS: न्यूझीलंडने मुंबईविरूद्धची कसोटी मालिका ३-०ने जिंकली. मायदेशात टीम इंडियावर पहिल्यांदाच अशी नामुष्की ओढवली. आता संघाची आगामी ५ सामन्यांची कसोटी मालिका २२ नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियात सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्याला रोहित शर्मा मुकणार असल्याचे बोलले जात आहे. काही सूत्रांच्या मते, तो दुसऱ्या कसोटीतही नसेल. अशा वेळी त्याच्याजागी उपकर्णधार जसप्रीत बुमराहकडे नेतृत्व द्यावे असे सुनील गावसकर यांनी सुचवले आहे. तर रोहित नसताना पंतला कर्णधार करावे असा सल्ला मोहम्मद कैफने दिला आहे. पण BCCI च्या डोक्यात काही वेगळाच प्लॅन असल्याचे दिसतंय. एका अनुभवी खेळाडूला संघात स्थान देऊन त्याच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता दिसत आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिका २२ नोव्हेंबरपासून आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ रवाना होण्याच्या काही दिवस आधी दोन खेळाडूंना ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात आले. केएल राहुल आणि ध्रुव जुरेल अशी या खेळाडूंची नावे आहेत. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात या दोन्ही खेळाडूंचा समावेश आहे. असे असूनही, दोघांचाही भारत अ संघात समावेश करण्यात आला, जेणेकरून ते ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध दुसरा अनधिकृत कसोटी सामना खेळू शकतील. असे मानले जाते की केएल राहुल आणि ध्रुव जुरेलला उर्वरित संघापूर्वी पाठवण्याचे कारण त्यांना ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांचा अंदाज यावा इतकाच नाही. कारण तशा परिस्थितीत यशस्वी जैस्वाल आणि सरफराज खान सारखे युवा खेळाडूही भारत अ संघात सामील झाले असते. पण क्रिकेट बोर्ड केएल राहुलबाबत वेगळे प्लॅनिंग करताना दिसतेय. काहीतरी नियोजन करत आहे, जे इतरांपेक्षा वेगळे आहे.
राहुल द्रविड प्रशिक्षक असल्यापासून संघ व्यवस्थापन त्याला पाठिंबा देत आहे. त्याला संघात ठेवण्यासाठी त्याला यष्टिरक्षक फलंदाज म्हणून खेळवण्यात आले. सर्फराजने दीडशतक मारल्यानंतरही राहुलच्या निवडीची चर्चा पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकासाठी होत आहे. त्यामुळे रोहितच्या अनुपस्थितीत राहुलला कर्णधारपद दिले जाऊ शकते अशा चर्चा रंगल्या आहेत.