aus vs ind test : न्यूझीलंडविरुद्धच्या दारुण पराभवानंतर भारतीय संघ टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. खासकरुन कर्णधार रोहित शर्मावर अनेकजण तोंडसुख घेत आहेत. भारताचे माजी खेळाडू सुनील गावस्कर यांनी रोहितबद्दल बोलताना, तो बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पहिला सामना खेळणार नसला तर जसप्रीत बुमराहला कर्णधार बनवायला हवे असे म्हटले होते. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला २२ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे.
गावस्कर म्हणाले होते की, भारताच्या निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी रोहितला आधीच कळवायला हवे होते की भारत आपल्या कर्णधाराशिवाय पहिली कसोटी खेळू शकणार नाही. अशा परिस्थितीत गरज भासल्यास बुमराहला पाचही सामन्यांसाठी संघाचा कर्णधार बनवायला हवा. पण, ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू आरोन फिंचला गावस्करांचे म्हणणे अजिबात पटले नाही. टीम इंडियाचा एकच कर्णधार आहे आणि तो म्हणजे रोहित शर्मा, असे त्याने म्हटले आहे.
"सुनील गावस्कर यांच्या विधानाशी मी अजिबात सहमत नाही. रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार आहे. अशा परिस्थितीत जर त्याला त्याच्या मुलाच्या जन्मासाठी घरीच राहावे लागले, तर त्याच्यासाठी हा एक सुवर्ण क्षण आहे. एक क्रिकेटर बाप होणार आहे, त्यामुळे त्याने त्याच्या कुटुंबीयांसोबतच वेळ घालवायला हवा", असेही फिंचने म्हटले. तो एका पॉडकास्टवर बोलत होता.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश रेड्डी, वॉशिंगटन सुंदर.
BGT चे वेळापत्रक२२ ते २६ नोव्हेंबर – पर्थ०६ ते १९ डिसेंबर - ॲडलेड१४ ते १८ डिसेंबर – ब्रिस्बेन.२६ ते ३० डिसेंबर – मेलबर्न०३ ते ०७ जानेवारी – सिडनी