India vs Australia Test Series : भारत-ऑस्ट्रेलिया याच्यातील चार सामन्यांची बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका ९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( WTC Final) फायनच्या दृष्टीने भारतासाठी ही मालिका खूपच महत्त्वाची आहे. त्यामुळे घरच्या मैदानावरील या मालिकेत दमदार कामगिरी करण्यासाठी भारतीय खेळाडू कसून सराव करत आहेत. ऑस्ट्रेलियाचा संघ २०२०-२१ मध्ये घरच्या मैदानावर झालेल्या मानहानिकारक पराभवाचा वचपा काढण्यासाठी कंबर कसून भारतात दाखल झाला आहे. पण, २०२०-२१च्या ऐतिहासिक कसोटी मालिका विजयातील स्टार गोलंदाजाचा भारतीय संघाने नेट बॉलर म्हणून समावेश केला आहे.
सहा वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर कसोटी मालिका खेळण्यासाठी आला आहे. या सहा वर्षांत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचे दोन दौरे केले आणि दोन्ही वेळेस कसोटी मालिका जिंकून इतिहास घडविला. ऑस्ट्रेलियाचा संघ कसोटी क्रमवारीत सध्या नंबर १ आहे, परंतु त्यांना मागील १९ वर्षांत भारतात कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. भारताचे खेळाडू नागपूरमध्ये सराव करत आहेत, तर ऑस्ट्रेलियाचा संघ बंगळुरूमध्ये सराव करतोय. आर अश्विनचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने त्याच्याच सारखी गोलंदाजी करणाऱ्या भारतीय गोलंदाजाचा नेट बॉलर म्हणून समावेश केला आहे.
भारतीय संघानेही त्यांच्या नेट बॉलर्समध्ये अतिरिक्त चार गोलंदाजांचा समावेश केला आहे. Cricbuzz ने दिलेल्या वृत्तानुसार वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, आर साई किशोर आणि सौरभ कुमार या चार गोलंदाजांचा भारतीय संघात नेट बॉलर म्हणून समावेश केला गेला आहे. वॉशिंग्टन सुंदर हा भारताच्या तिनही फॉरमॅटच्या संघात खेळतो. अन्य तीन फिरकीपटूंचे अद्याप कसोटी पदार्पण झालेले नाही. २०२०-२१ मधील ऐतिहासिक कसोटी मालिका विजयात वॉशिंग्ट सुंदरची भूमिकाही महत्त्वाची होती.
संपूर्ण वेळापत्रक ( Full Schedule)
पहिली कसोटी - ९ ते १३ फेब्रुवारी, नागपूरदुसरी कसोटी - १७ ते २१ फेब्रुवारी, दिल्लीतिसरी कसोटी - १ ते ५ मार्च, धर्मशाला चौथी कसोटी - ९ ते १३ मार्च, अहमदाबाद
भारत ( पहिल्या दोन कसोटीसाठी)- रोहित शर्मा, लोकेश राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकत, सूर्यकुमार यादव.
ऑस्ट्रेलिया- पॅट कमिन्स, ॲश्टन ॲगर, स्कॉट बोलंड, ॲलेक्स केरी, कॅमेरून ग्रीन, जोश हेझलवूड, पीटर हँड्सकोम्ब, ट्रॅव्हीस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टोड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेपसन, डेव्हिड वॉर्नर
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"