IND vs AUS Test Series : भारताच्या ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमन दणदणीत राहिले. दुखापतीतून सावरल्यानंतर हार्दिकने गोलंदाजी व फलंदाजीत उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये गुजरात टायटन्सचा कर्णधार म्हणून जेतेपद जिंकून देणाऱ्या हार्दिककडे BCCI भारताच्या ट्वेंटी-२० संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी पूर्णवेळ सोपवण्याची तयारी करत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात हार्दिकन १७ चेंडूंत ३० धावा केल्या. यानंतर हार्दिकने गोलंदाजीत धुमाकूळ घातला आणि ४ षटकांत १६ धावांत ४ विकेट्स घेतल्या.
गोलंदाजी आणि फलंदाजीतील हार्दिक पांड्याची झंझावाती कामगिरी पाहून चाहते त्याच्या कसोटी संघात पुनरागमनाची वाट पाहत आहेत, ज्याबाबत खुद्द हार्दिक पांड्याने एक मोठे अपडेट दिले आहे. हार्दिकने त्याची शेवटची कसोटी २०१८ साली इंग्लंडविरुद्ध साउथहॅम्प्टनमध्ये खेळली होती. हार्दिक पांड्यावर २०१९ मध्ये शस्त्रक्रिया झाली होती आणि तेव्हापासून तो भारतीय कसोटी संघातून बाहेर होता.
हार्दिक पांड्या सामन्यानंतर म्हणाला, "खरं सांगायचं तर मलाही षटकार मारायला आवडतात. पण आता मला स्वत:ला आणखी पुढे न्यावं लागणार आहे. यासाठी मला माझा स्ट्राईक रेट कमी करावा लागला तरी चालेल. कारण जेव्हा मी युवा होतो, महेंद्रसिंग धोनी त्यावेळी मैदानात असायचा आणि मी मोकळेपणाने मोठमोठे फटके मारायचो. पण, आता त्याच्या निवृत्तीनंतर तिच जबाबदारी माझ्यावर आली आहे, असं मला वाटतंय. तरुणांना संधी देताना मी सिनियर म्हणून जबाबदारी घेतोय. मला अनुभव आहे आणि मला येथे फलंदाजी कशी करायची हे माहित आहे.''
भारतीय कसोटी संघात पुनरागमन करण्याबाबत हार्दिक म्हणाला, ''मला जेव्हा वाटेल की माझ्यासाठी कसोटी क्रिकेट खेळण्याची योग्य वेळ आली आहे तेव्हा मी भारतीय कसोटी संघात परतेन. सध्या मी मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत आहे, जे महत्त्वाचे आहे. आगामी वन डे वर्ल्ड कप आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप ( २०२४) पाहता संपूर्ण लक्ष मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर आहे.''
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"