IND vs AUS 1st Test: भारताचे सर्व सीनियर खेळाडू आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी एकत्रित येणार आहेत. रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी हे सर्व ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका गाजवून आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये एन्ट्री घेण्यासाठी सज्ज आहेत. पण, युवा खेळाडूंना सोबत घेऊन कागारूंचा सामना करण्यासाठी तयार असलेल्या भारतीय संघाला धक्का बसला आहे. जखमी श्रेयस अय्यर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नागपूर कसोटीत खेळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादवच्या कसोटी पदार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
ESPN ने दिलेल्या वृत्तानुसार श्रेयस अय्यर अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही आणि त्याची फिटनेस टेस्ट होणे बाकी आहे. त्यामुळे ९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीत त्याचे खेळणे अवघड आहे. बांगलादेशविरुद्धच्या मागील कसोटी मालिकेत त्याने १०१च्या सरासरीने धावा केल्या होत्या. या वृत्तावर विश्वास ठेवला तर पहिल्या कसोटीत अय्यरच्या जागी सूर्यकुमारला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. पाठीच्या दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला श्रेयस दुसऱ्या कसोटीपूर्वी तंदुरुस्त होण्याची अपेक्षा आहे. मुंबईचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतून बाहेर पडला. श्रेयसचे सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पुनर्वसन सुरू आहे. अनेक इंजेक्शन्स घेतल्यानंतरही अय्यर यांना पाठीच्या खालच्या भागात दुखत आहे. अशा परिस्थितीत त्यांना किमान दोन आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.
BCCIच्या सूत्राने द इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, “त्याची दुखापत अपेक्षेप्रमाणे बरी झालेली नाही आणि त्याला पुन्हा क्रिकेट खेळण्यासाठी किमान दोन आठवडे लागतील. पहिल्या चाचणीसाठी तो नक्कीच उपलब्ध नसेल आणि दुसऱ्या चाचणीसाठी त्याची उपलब्धता त्याच्या फिटनेस अहवालाच्या अधीन असेल.''
दरम्यान, रवींद्र जडेजा पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. तो नुकताच रणजी करंडक स्पर्धेचा सामना खेळला अन् त्यात त्याने दुसऱ्या डावात ७ विकेट्स घेतल्या. सौराष्ट्रच्या कर्णधाराने तामिळनाडू विरुद्धच्या सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याने टीम इंडियाचा आत्मविश्वास उंचावला आहे.
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"