Join us  

Ind vs Aus Test: विराट कोहलीसाठी विशेष रणनीती तयार : कोच लँगर

कोहलीला बाद करण्याच्या पद्धतीचा शोध घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 4:35 AM

Open in App

ॲडिलेड : गुरुवारपासून प्रारंभ होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात आमचा संघ कोहलीविरुद्ध विशेष रणनीतीसह उतरणार असल्याचे ऑस्ट्रेलियाचे कोच जस्टीन लँगर यांनी सांगितले. कोहली पहिल्या कसोटीनंतर पितृत्व रजेसाठी मायदेशी परतणार आहे. लँगर म्हणाले, ‘तो महान खेळाडू असून शानदार कर्णधार आहे. मी त्याचा आदर करतो, पण त्याच्यासाठी विशेष रणनीती तयार करावी लागेल. फलंदाज व कर्णधार म्हणून तो भारतीय संघासाठी किती महत्त्वाचा आहे, याची आम्हाला कल्पना आहे. रणनीतीवर अंमल करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. त्याला धावा काढण्यापासून रोखावे लागेल. शेवटी तो बॅटनेच अधिक छाप सोडू शकतो. आता आम्ही त्याला बरेच बघितले असून त्यानेही आम्हाला बघितले आहे.’लँगर म्हणाले, आमचा संघ त्याच्या तंत्रावर फोकस करेल आणि मुद्दाम कोहलीसोबत वाद घालण्यापेक्षा त्याला बाद करण्याच्या पद्धतीचा शोध घेईल. आम्ही त्याला बाद करण्याचा प्रयत्न करू. तो शानदार खेळाडू असल्यामुळे स्लेजिंगबाबत चर्चाही करणार नाही. आम्ही कौशल्याच्या आधारावर खेळतो भावनेच्या भरात नाही. आम्हाला भावनेवर नियंत्रण राखावे लागेल. ऑस्ट्रेलियाने भारताच्या तुलनेत गुलाबी चेंडूने अधिक सामने खेळले आहेत, पण लँगर यांच्या मते त्याचा संघाला कुठला लाभ होणार नाही. ते म्हणाले,‘मी नेहमीच म्हणतो सर्वोत्तम संघ व खेळाडू परिस्थितीनुरुप खेळतात. सामना कितीही प्रतिष्ठेचा असो आणि चेंडूचा रंग कुठलाही असतो. भूतकाळात काय घडले याचा परिणाम होणार नाही, पण त्याची पुनरावृत्ती करणे चांगले राहील.’प्रशिक्षक म्हणाले,‘आम्ही वर्षभरापासून कसोटी सामना खेळलो नाही. मैदानावर चांगली कामगिरी करावी लागेल. मग तो दिवस-रात्र सामना असो किंवा दिवसाचा सामना असो. त्यामुळे यापूर्वीच्या कामगिरीला महत्त्व आहे, असे मला वाटत नाही.’यजमान संघाला २०१८-१९ च्या मालिकेत पराभव स्वीकारावा लागला होता, पण आमच्या खेळाडूंच्या मनात बदल्याची भावना नाही, असेही लँगर म्हणाले. बदला हा चांगला शब्द नाही, प्रतिद्वंद्विता म्हणणे संयुक्तिक ठरेल.खेळाडूंमध्ये आपसात सामंजस्य निर्माण होण्याचे श्रेय इंडियन प्रीमियर लीगला जाते, असेही ते म्हणाले. लँगर म्हणाले की,‘मर्यादित षटकांची मालिका चांगल्या माहोलमध्ये खेळल्या गेली आणि भविष्यातही असेच होईल, अशी आशा आहे.’कमरेत दुखणे उमळताच स्मिथने टाळला सरावॲडिलेड: ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथ याच्या कमरेला सूज आल्यामुळे त्याने मंगळवारी सराव टाळला. स्मिथने जवळपास दहा मिनिटे सहकाऱ्यांसोबत फिटनेस वॉर्मअप केले. त्यानंतर फुटबॉल सत्रात तो सहभागी झाला नाही. थेट ड्रेसिंग रूममध्ये जाऊन बसला. चेंडू उचलतेवेळी त्याच्या कमरेत लचक भरल्याचे समजते. संघाचे फिजिओ डेव्हिड बिकले हे देखील स्मिथसोबत ड्रेसिंग रुमकडे रवाना झाले होते. तो आज बुधवारी देखील सराव सत्रात सहभागी होईल,अशी अपेक्षा नाही. तथापि स्मिथ सामन्यासाठी उपलब्ध असेल, असे ऑस्ट्रेलियातील माध्यमांनी म्हटले आहे. स्मिथने वन डे मालिकेत दोन शतके ठोकली होती. ग्रीन ॲडिलेड कसोटी खेळेल : कनकशनबाबत (डोक्याला दुखापत) प्रोटोकॉल पूर्ण केल्यानंतरच प्रतिभावान अष्टपैलू कॅमरन ग्रीन भारताविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकेल, असे ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक लँगर यांनी मंगळवारी सांगितले. ग्रीन जर फिट नसेल तर मॅथ्यू वेड किंवा बर्न्स यांना संधी मिळण्याबाबत लँगर यांनी सकारात्मक उत्तर दिले. 

टॅग्स :विराट कोहली