सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियावर प्रथमच 2-1 ने मालिका विजय मिळविणाऱ्या भारतीय संघाचे अभिनंदन करताना माजी दिग्गज सुनील गावस्कर यांनी ‘स्मिथ-वॉर्नर ऑस्ट्रेलियन संघात नसणे, ही भारताची चूक नाही,’ असे म्हटले आहे.
अंधुक प्रकाश आणि पावसाच्या व्यत्ययामुळे सिडनी कसोटी सामना अनिर्णीत राहिला. वरुणराजाच्या कृपेमुळे ऑस्ट्रेलियाने पराभव टाळला, मात्र भारताने याआधीच दोन कसोटी सामने जिंकल्यामुळे मालिकेत पराभव टाळणे ऑस्ट्रेलियाला जमले नाही. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने भारतीय संघाचे विजयाबद्दल कौतुक केले.
स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यासारखे अनुभवी खेळाडू संघात नसल्यामुळे आमच्या संघाची अशी गत झाल्याचे सांगून पेनने सहानुभुती मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. त्याचा हा प्रयत्न लिटल मास्टर गावस्कर यांनी हाणून पाडला. ‘स्मिथ-वॉर्नर ऑस्ट्रेलिया संघात नाहीत यात भारतीय संघाची चूक नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलिया या दोन्ही खेळांडूवर कमी काळासाठी बंदी घालू शकली असती. चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणानंतर या दोघांवर वर्षभरासाठी बंदी घालण्यात आली. सध्याच्या मालिकेत सर्वच आघाड्यांवर भारताने ऑस्ट्रेलियाला मात दिली . त्यामुळे त्यांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक व्हायलाच हवे,’ असे गावस्कर यांनी म्हटले.