Steve Smith, IND vs AUS Test: भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) हा क्रिकेट सामना कायम चर्चेचा विषय असतो. त्यात जर ती कसोटी मालिका असेल तर चर्चांना आणि नवनव्या वृत्तांना उधाण येते. भारतीय संघ यंदा वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. यंदाची बॉर्डर-गावसकर कसोटी (Border Gavaskar Trophy) मालिका पाहुण्यांच्या भूमीत रंगणार आहे. दोन्ही संघ यासाठी आवश्यक ती तयारी करत आहेतच. पण सध्या स्टीव्ह स्मिथच्या बॅटिंगच्या क्रमांकावरून बरीच चर्चा रंगली आहे. भारताविरूद्धच्या कसोटीत स्मिथ ओपनिंग करणार, अशी चर्चा सुरु झाली होती. पण आता चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
स्टीव्ह स्मिथच्या फलंदाजीच्या क्रमाशी संबंधित सर्व चर्चा सध्या थांबण्याच्या मार्गावर आहेत. SEN रेडिओनुसार, स्टीव्ह स्मिथ भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये चौथ्या क्रमांकावरच खेळताना दिसू शकतो. मात्र, या माहितीला कुठलीही अधिकृत मान्यता मिळालेली नाही. डेव्हिड वॉर्नरच्या निवृत्तीनंतर ऑस्ट्रेलियन संघासमोर ओपनिंगचा मोठा प्रश्न आहे. सलामीवीर उस्मान ख्वाजाचा जोडीदार म्हणून स्मिथचा विचार केला जात होता. 'माझ्यासाठी फलंदाजीचा क्रमांक हा केवळ एक नंबर आहे, मला क्रमांकाशी काहीही फरक पडत नाही. मी कोणत्याही क्रमांकावर खेळण्यास तयार आहे,' असे स्मिथ म्हणाला होता. पण आता मात्र स्मिथ मधल्या फळीतच फलंदाजी करणार असल्याचे जवळपास निश्चित आहे.
हा फलंदाज करू शकतो सलामी
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये उस्मान ख्वाजासोबत सलामी कोण करणार? सेन रेडिओनुसार, ट्रेव्हिस हेडला उस्मान ख्वाजाचा सलामीचा जोडीदार बनवला जाऊ शकते. जर असे झाले तर ऑस्ट्रेलियाची टॉप-4 ची फलंदाजी उस्मान ख्वाजा, ट्रेव्हिस हेड, मार्नस लाबूशेन आणि स्टीव्ह स्मिथ अशी असेल.
स्टीव्ह स्मिथची कसोटी कारकीर्द
स्टीव्ह स्मिथने आतापर्यंत १०९ कसोटी सामने खेळले असून त्यात त्याने ५७च्या सरासरीने ९,६८५ धावा केल्या आहेत. या कालावधीत स्मिथने सलामीवीर म्हणून ४ कसोटी सामनेही खेळले होते. त्यात त्याने २९च्या सरासरीने १७१ धावा केल्या होत्या.