नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर चषक कसोटी मालिकेतील शेवटचा सामना गुरुवारपासून सिडनी येथे खेळवला जाणार आहे. चार सामन्यांच्या मालिकेत भारत 2-1 अशा आघाडीवर आहे आणि ते मालिका विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. 1996मध्ये प्रथम बॉर्डर-गावस्कर चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सिडनी कसोटीनंतर होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी निमंत्रण पाठवण्यात आलेले नाही.
एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले,''बॉर्डर-गावस्कर मालिकेच्या चषक वितरण सोहळ्यासाठी उपस्थित राहणार का, अशी विचारणा मला ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सदरलँड यांनी केली होती. मला जायचेही होते, परंतु सदरलँड यांनी राजीनामा दिल्यानंतर माझ्याशी त्याबाबत कोणीही संपर्क झालेला नाही.'' क्रिकेट ऑस्ट्रेलियाक़डून कोणतेही आमंत्रण न मिळाल्याने गावस्कर पुरस्कार वितरण सोहळ्याला जाण्याची शक्यता कमीच आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेणाऱ्या भारतीय संघाने चौथ्या सामन्यासाठी 13 सदस्यांचा संघ जाहीर केला. उमेश यादव, कुलदीप यादव आणि आर अश्विन यांचा या चमूत समावेश करण्यात आला आहे. हे तिघेही मेलबर्न कसोटीत खेळले नव्हते. सिडनीची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी पोषक असल्याने कुलदीपला अंतिम अकरात संधी मिळण्याची शक्यता आहे. अश्विन अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही.