अॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताचा कर्णधार विराट कोहली हा सध्या भन्नाट फॉर्मात आहे. ऑस्ट्रेलियामध्ये तर कोहलीचा फॉर्म हा नेहमीच चांगला राहीलेला आहे. त्यामुळे या दौऱ्यातही कोहलीची 'रनमशिन' धडाडण्यासाठी सज्ज झाली आहे. यासाठी कोहलीने कसून सराव केला असून त्याचा व्हिडीओ चांगलाच वायरल झाला आहे.
कोहलीने 2014-15च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 8 डावांत 692 धावा केल्या होत्या. स्टीव्हन स्मिथनंतर ( 769) त्या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा तो दुसरा फलंदाज ठरला होता. त्या मालिकेत कोहलीने चार शतकं आणि एक अर्धशतक झळकावलं होतं. ऑस्ट्रेलियात कोहलीने यजमानांविरुद्ध 8 सामन्यांत 992 धावा केल्या आहेत. त्याला 1000 धावांचा पल्ला गाठण्यासाठी 8 धावा हव्या आहेत.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला ऑस्ट्रेलियातील खेळपट्टीवर धावा करण्यात नेहमी आनंद मिळतो. 2014 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता, परंतु कोहलीसाठी हा दौरा संस्मरणीय ठरला होता. त्याने त्या दौऱ्यात खोऱ्याने धावा केल्या होत्या आणि आता त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला कसोटी सामना 6 डिसेंबरपासून सुरू होत आहे. या कसोटीत अवघ्या आठ धावा कोहलीला महान फलंदाज सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या पंगतीत नेऊन बसवणार आहे.