Ind Vs Aus Test : फासे उलटे पडले आणि भारतीय संघ त्यात अडकला

फिरकीसमोर फलंदाजांचे तंत्र उघडे पडले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2023 10:46 AM2023-03-05T10:46:07+5:302023-03-05T10:47:58+5:30

whatsapp join usJoin us
Ind Vs Aus Test what happened in test cricket r ashwin ravindra jadeja india loast match | Ind Vs Aus Test : फासे उलटे पडले आणि भारतीय संघ त्यात अडकला

Ind Vs Aus Test : फासे उलटे पडले आणि भारतीय संघ त्यात अडकला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अयाज मेमन,
कन्सल्टिंग एडिटर 

ऑस्ट्रेलिया संघासाठी फिरकीला अनुकूल खेळपट्ट्या बनविण्याची भारताची रणनीती पहिल्या दोन कसोटीत तर यशस्वी ठरली. मात्र, इंदूर कसोटीत फासे उलटे पडले आणि स्वत: आखलेल्या डावपेचात भारतीय संघ अडकला. या पराभवामुळे आगामी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीचा मार्ग आपल्यासाठी खडतर झाला आहे. कुठल्याही परिस्थितीत भारताला चौथी कसोटी जिंकणे क्रमप्राप्त आहे. जर त्यात अपयश आलेच तर न्यूझीलंड-श्रीलंका मालिकेकडे आपल्याला आस लावून बसावे लागेल. 

...तर चित्र काहीसे वेगळे असते
खेळपट्टी जरी फिरकीला पोषक असली तरी पहिल्या डावात भारताची कोसळलेली फलंदाजी यातना देणारी होती. वर्षानुवर्षे भारतीय खेळपट्ट्या अशाच बनत आलेल्या आहेत. त्यामुळे भारतीय फलंदाजांनी खेळपट्टीचा नूर ओळखून फलंदाजी करणे सर्वांनाच अपेक्षित होते. पण ऑस्ट्रेलियाच्या फिरकीसमोर भारतीय फलंदाजांचे तंत्र उघडे पडले.

नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर अनेक चाहते आस लावून बसले की आता शतकांची आरास बघायला मिळणार. पण दुर्दैव असे की संपूर्ण संघालाच कशीबशी शतकी धावसंख्या ओलांडता आली. तरीसुद्धा अश्विन, जडेजा आणि उमेश यादवने भन्नाट स्पेल टाकत कांगारूंना केवळ ८८ धावांची आघाडीच मिळू दिली. मात्र, दुसऱ्या डावातही भारताचे पहिले पाढे पंचावन्न. ऑस्ट्रेलिया संघाने हातातोंडाशी आलेली विजयाची सुवर्णसंधी सोडली नाही. अवघ्या ७६ धावांचे लक्ष्य त्यांनी लीलया पेलले. दुसऱ्या डावात भारतीय संघ कमीत कमी १४० ते १५० धावांची आघाडी घेण्यात यशस्वी ठरला असता तर चित्र काहीसे वेगळेसुद्धा दिसू शकले असते. कदाचित ऑस्ट्रेलिया संघ दबावात येऊन कोसळला असता. 

अश्विन, जडेजा, अक्षरने लाज राखली
भारताची आघाडीची फळी कोसळायची ही काही पहिलीच वेळ नव्हती. संपूर्ण मालिकेचाच विचार केल्यास भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना लौकिकाला साजेसा खेळ करता आलेला नाही. नागपूर कसोटीतले रोहितचे शतक सोडले तर इतर फलंदाजांनी सपशेल निराशा केली. खासकरून राहुल, विराट आणि शुभमनकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण हे तिघेही त्या पूर्ण करण्यात कमी पडले. भारतीय संघ खऱ्या अर्थाने वाचला तो अश्विन, जडेजा आणि अक्षर यांच्या अष्टपैलू कामगिरीमुळे. जर हे तिघे अपयशी ठरले असते तर मालिकेचे चित्र भारताच्या विरोधात दिसले असते.

कसोटीसाठी लागणाऱ्या संयमाचा अभाव
फिरकी खेळण्यास भारतीय फलंदाज असमर्थ आहेत, असे मी अजिबात म्हणणार नाही. पण गल्लत झाली ती कसोटी फलंदाजीसाठी आवश्यक असणाऱ्या तंत्र आणि संयमामध्ये. झटपट क्रिकेटमुळे कसोटीसाठी लागणारा संयम सध्या फलंदाजांमध्ये कमी होताना दिसतो आहे. मला सुनील गावसकरांची १९८७ ची एक खेळी आठवते. त्यावेळी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात बंगळुरू येथील खेळपट्टी इंदूरपेक्षाही वाईट होती. पण अद्भुत तंत्र आणि भक्कम बचावाच्या जोरावर गावसकरांनी ९६ धावांची खेळी केली. हा त्यांचा शेवटचा कसोटी सामना होता. भारतीय संघ थोडक्यात ही कसोटी हरला पण गावसकरांच्या खेळीचे सर्वत्र कौतुक झाले. इम्रान खानने तर मी पाहिलेली सर्वोत्कृष्ट कसोटी खेळी या शब्दांत गावसकरांचे कौतुक केले होते. 

भारतीय संघाने एकच गोष्ट लक्षात ठेवायला हवी की आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळातांना कोणीही तुम्हाला आयते ताट वाढून देणार नाही. गरजेची असलेली प्रत्येक गोष्ट तुमची तुम्हाला मिळवावी लागेल. रोहितच्या संघानेही आता अपयश झटकून अहमदाबाद कसोटीतला आत्मविश्वासाने सामोरे जायला हवे. तसेच कांगारूंवर दणदणीत विजय मिळवून दिमाखात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करायला हवा. तरच इंदूरच्या पराभवाचे दु:ख भारतीयांना पचविता येईल.

नाथन लायन ठरला गेमचेंजर 
या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट विसरून चालणार नाही. ती म्हणजे नाथन लायनची गोलंदाजी. टप्पा आणि चेंडूवरील नियंत्रण याबाबतीत लायनची अचूकता वादातीत आहे. त्याचा प्रत्येक चेंडू भारतीय फलंदाजांना विचार करायला भाग पाडत होता. मर्फी आणि कुहेनमन यांनीही पर्दापणाची कसोटी मालिका खेळताना त्याला तोडीस तोड साथ दिली. 

कांगारू कानामागून आले आणि तिखट झाले
तिसऱ्या कसोटीतला भारताचा पराभव धक्कादायक होता. कारण २-० च्या आघाडीसह भारतीय संघ दिमाखात इंदूरमध्ये दाखल झाला. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघाची मानसिक अवस्था खालावलेली होती. अर्धा डझनपेक्षा जास्त खेळाडू मायदेशी परतलेले. भरीस भर म्हणजे कर्णधार पॅट कमिन्सही वैयक्तिक कारणामुळे तिसरी कसोटी खेळू शकणार नव्हता. त्यामुळे सर्वांचा हा समज होऊन बसला की इंदूरमध्येच भारतीय संघ बॉर्डर-गावसकर मालिकेवर नाव कोरणार आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठणार. मात्र, कसोटी सुरू होताच अनेक गोष्टी घडल्या. कुणाच्याही ध्यानी-मनी नसताना ऑस्ट्रेलिया संघाने भारताला अवघ्या अडीच दिवसांत नेस्तनाबूद केले. या दारुण पराभवाला कारणीभूत ठरली  ती आपली अवसानघातकी फलंदाजी. पुजारा सोडला तर कुठल्याच फलंदाजाने आश्वासक खेळी केली नाही. 

Web Title: Ind Vs Aus Test what happened in test cricket r ashwin ravindra jadeja india loast match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.