मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : पर्थ कसोटीतील पराभवानंतर भारतीय खेळाडूंच्या कामगिरी बरोबरच कर्णधार विराट कोहलीचा आक्रमकपणा हा चर्चेचा विषय राहिला. कोहलीच्या या आक्रमकतेवर भारताचा माजी कसोटीपटू संजय मांजरेकरसह ऑस्ट्रेलियाचे दिग्गज अॅलन बॉर्डर, माईक हसी आणि मिचेल जॉन्सन यांनी टीका केली. मात्र, भारताचा माजी गोलंदाज झहीर खान याने कोहलीला मैदानावरील आक्रमकता कायम राखण्याचा सल्ला दिला.
तो म्हणाला,''कोहलीला मी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा सल्ला देतो. यशस्वी होण्यासाठी कोहलीला जे प्रेरीत करते ते त्याने करावे. त्याने यशस्वी मंत्र सोडू नये. मग त्याने लोक काय म्हणतात याचा विचार करूच नये. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात असेच राहावे लागते.'' भारताचा आणखी एक माजी गोलंदाज प्रविण कुमारनेही झहीरच्या वक्तव्यावर सहमती दर्शवली आहे. तो म्हणाला,'' अंडर 16, अंडर 19 आणि रणजी करंडक स्पर्धेतही कोहली याच आक्रमकतेने खेळतो. मग भारताकडून खेळताना त्याने ती आक्रमकता कायम राखली तर
त्यात गैर काय? त्याच्यासोबत मी बरेच सामने खेळलो आहे आणि आक्रमकतेशिवाय तो उत्तम खेळ करूच शकत नाही.'' ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटीत 146 धावांनी विजय मिळवून मालिकेत 1-1 अशी बरोबरी मिळवली.