Usman Khawaja, IND vs BAN: ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा ९ फेब्रुवारीपासून नागपुरात सुरू होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनच्या आव्हानासाठी तयारी करत आहे. ऑस्ट्रेलिया संघाचा भाग असलेला उस्मान ख्वाजाचा भारतीय भूमीवरील पहिल्यांदाच कसोटी सामना खेळणार आहे. उस्मान ख्वाजा अतिशय काळजीपूर्वक सर्व प्रकारच्या आव्हानांची तयारी करत आहे. असे असतानाच त्याने भारतीय फिरकीपटू ऑस्ट्रेलिया समोरील मोठे आव्हान असल्याचे सांगितले. उस्मान ख्वाजाच्या म्हणण्यानुसार, आर अश्विन हा ऑस्ट्रेलियासाठी मोठा धोका असल्याचे तो म्हणाला.
"आर अश्विन हा डावखुऱ्या फलंदाजांसाठी मोठा धोका असेल. कारण तो एखाद्या तोफेप्रमाणे अचूक मारा करू शकतो. तो खूप कुशल आहे आणि त्याच्याकडे गोलंदाजीत विविधता आहे, जी तो खूप चांगल्या प्रकारे वापरतो. त्याचा सामना करणे आव्हानात्मक असेल. तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी विकेट फिरणार हे साऱ्यांनाच माहिती आहेत. तो जास्तीत जास्त षटके टाकेल. त्याच्यासमोर मी धावा कशा कराव्या, याचा मला विचार करावा लागणार आहे," असे उस्मान ख्वाजा म्हणाला.
"विकेट चांगली असेल तर नवीन चेंडू खेळणे सर्वात सोपे असते, पण विकेटवर भेगा पडल्या तर अशा वेळी स्पिनर नवीन चेंडू हाताळत असतील तर ते धोकादायक ठरते. अशा वेळी भारतात फलंदाजी करणे सर्वात कठीण आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, अश्विनसारख्या अनुभवी गोलंदाज ज्या फिरकी फळीचे नेतृत्व करतो, त्या पद्धतीच्या फिरकी गोलंदाजांना खेळणं हेच ऑस्ट्रेलियासमोरील सर्वात मोठे आव्हान असेल," असेही ख्वाजाने कबुली दिली.