Virat Kohli, IND vs AUS, WTC 2023 Final: गेली दोन महिने सुरू असलेला आयपीएलचा हंगाम अखेर संपला. वेगवेगळ्या संघाकडून खेळणारे भारतीय खेळाडू आता पुन्हा एकदा टीम इंडियासाठी खेळण्यास सज्ज झाले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा हंगाम सुरू होत असून त्याची सुरुवात जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याने होणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ ही स्पर्धा जिंकण्यासाठी जिवाचं रान करताना दिसतोय. सरावात ते कोणतीही कसर सोडत नाहीयेत. त्याचप्रमाणे भारतीय खेळाडूदेखील मन लावून सराव करताना दिसत आहेत. त्यातही विराट कोहलीचा नेट्समधील सराव एका ऑस्ट्रेलियन खेळाडूला थक्क करणारा ठरलाय. विराट कोहलीचा दमदार सराव पाहून तो थक्क तर झालाच आहे, पण त्याने यावरून इतर खेळाडूंना एक सल्लाही दिला आहे.
विराट कोहली जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. त्याने कठोर परिश्रमाने एक उत्तम फलंदाज बनण्याचे ध्येय गाठले आहे. त्याची ही मेहनत नेट्समध्ये अजूनही दिसून येते. विराटचे हेच परिश्रम पाहून ऑस्ट्रेलियन खेळाडू जोश हेझलवूड थक्क झाला. प्रत्येक खेळाडूने विराट कोहलीप्रमाणेच मेहनत केली पाहिजे असे तो म्हणाला.
विराट कोहलीचा सराव पाहण्यासारखा आहे, असे जोश हेजलवूड म्हणाला. त्याने आपले म्हणणे आयसीसीच्या वेबसाईटवर बोलताना मांडले. हेझलवूडच्या म्हणण्यानुसार, "विराट कोहली खूप मेहनत करतो. नेट्समध्ये सरावाला जाणारा तो पहिला खेळाडू असतो आणि नेट्समध्ये शेवटपर्यंत सराव करणाऱ्यांमध्येही तो असतो. प्रत्येकाने त्याच्या खेळाप्रती समर्पण आणि दररोज शिकण्याची इच्छा या गोष्टी अंगी बाळगल्या पाहिजेत. विराट जे करतो तेच प्रत्येक खेळाडूने करायला सुरुवात केली तर त्यांचा खेळ तर सुधारेलच पण संपूर्ण संघालाही फायदा होईल. विराट कोहलीचे यश त्याच्या मेहनतीमुळे आहे. विराट कोहलीचे 3 गुण म्हणजे अप्रतिम फलंदाज, फिटनेसमध्ये अव्वल आणि फलंदाजीच्या कौशल्याप्रमाणेच फिल्डिंगमध्येही चांगली कामगिरी हे त्याला सर्वोत्तम बनवते", असे हेजलवूड म्हणाला.
दरम्यान, जोश हेजलवुड देखील विराट कोहलीच्या टीम आरसीबीकडून आयपीएलमध्ये खेळतो. मात्र जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत ते आमनेसामने असणार आहेत. ऑस्ट्रेलियन संघात येण्यापूर्वी हेजलवूडला फिटनेस चाचणी द्यावी लागणार आहे. तो बरेच दिवस दुखापतीमुळे संघाबाहेर होता. WTC फायनल 7 जूनपासून सुरू होत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा कसोटी सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे.
Web Title: IND vs AUS The Australian bowler was stunned to see Virat Kohli practice ahead of WTC 2023 Final
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.