नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद हा लोकेश राहुलबाबत नेहमी आक्रमक भूमिकेत असतो. दिल्ली कसोटी सामन्यातही लोकेश राहुलच्या फ्लॉपनंतर कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी विदेशातील सामन्यांतील त्याच्या चांगल्या खेळीचा दाखला देत त्याला पाठिंबा देण्याचे बोलले होते, मात्र आता व्यंकटेश प्रसादने एकामागून एक ट्विट करत यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. विदेशातील इतर खेळाडूंच्या तुलनेत लोकेश राहुलची आकडेवारी फारशी चांगली नसल्याचे प्रसादने म्हटले आहे.
व्यंकटेश प्रसादने म्हटले, "लोकेश राहुलचा विदेशातील कसोटी विक्रम खूप चांगला आहे. पण आकडेवारी काही वेगळेच सांगते. 56 डावात त्याची सरासरी 30 आहे. त्याने विदेशात 6 शतके झळकावली आहेत परंतु त्याच्याकडे अनेक कमी-स्कोअर आहेत आणि म्हणूनच त्याची सरासरी 30 आहे. चला मग काही इतर खेळाडूंची सरासरी पाहूया."
याशिवाय तो असेही म्हणाला की, अलीकडील सलामीवीरांमध्ये शिखर धवनची विदेशात सर्वोत्तम सरासरी आहे. त्याचबरोबर देशांतर्गत सामन्यांमध्येही त्याची कामगिरी चांगलीच राहिली आहे.
व्यंकटेश प्रसादने मयंक अग्रवालचे उदाहरण देऊन भारतातील त्यांचा विक्रम कसा जबरदस्त आहे याविषयी स्पष्टीकरण दिले. याशिवाय तो फिरकीपटूंविरूद्ध चांगला खेळतो असे त्याने म्हटले.
मागील काही दिवसांपासून लोकेश राहुल खराब फॉर्मचा सामना करत आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात तो मोठी खेळी करू शकला नाही आणि स्वस्तात माघारी परतला. लोकेश राहुलने दुसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात 17 तर दुसऱ्या डावात केवळ 1 धाव केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"