सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताच्या विराट कोहलीला पहिल्यांदा कर्णधारपद मिळाले होते ते ऑस्ट्रेलियाच्या 2014च्या दौऱ्यात. कारण महेंद्रसिंग धोनीने या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात अचानक कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आणि भारताला नवे नेतृत्व मिळाले. त्यामुळे कोहलीसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा नेहमीच अविस्मरणीय असाच राहणार आहे.
इंग्लंड दौऱ्यात सपाटून मार खाल्ल्यावर भारताचा संघ ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाला होता. इंग्लंड दौऱ्यात धोनीला दुखापत झाली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात धोनीला खेळता आले नव्हते. त्यामुळे पहिल्या कसोटी सामन्यात कोहली हा भारताचा हंगामी कर्णधार होता. या सामन्यात भारताला ४८ धावांनी पराभव पत्करावा लागला होता.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यात धोनी कर्णधार म्हणून खेळला होता. दुसऱ्या सामन्यात भारताला चार विकेट्सने पराभव पत्करावा लागला होता. पण तिसरा सामना मात्र भारताने अनिर्णीत राखला होता. या सामन्यानंतर धोनीने तडकाफडकी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर चौथ्या सामन्यात कोहली हा भारताचा कर्णधार झाला आणि ही लढत अनिर्णीत राहिली होती.