चेन्नई: सांघिक खेळाच्या जोरावर निर्णायक सामन्यात पकड मिळवल्यानंतरही भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात २१ धावांनी पराभव पत्करावा लागला. यासह कांगारूंनी तीन सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी बाजी मारली. तसेच, त्यांनी भारतीयांना एकदिवसीय क्रमवारीत मागे खेचताना अव्वल स्थानावरही कब्जा केला. अॅडम झम्पा आणि एश्टन एगर यांनी मिळून ६ बळी घेत भारतीयांची फिरकी घेतली.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील तिसर्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहली आणि मार्कस स्टॉयनिस यांच्यातील भांडणाचा व्हिडिओ समोर आला आहे. भारतीय डावाच्या २१व्या षटकात ऑस्ट्रेलियाचा मार्कस स्टॉयनिस क्रिजच्या दिशेने जात असताना विराट कोहली आणि त्याची टक्कर झाली. यानंतर स्टॉयनिस दुसऱ्या दिशेने पाहू लागला आणि कोहलीने त्याच्याकडे रोखून पाहिले. दोघांमध्ये शीतयुद्ध पाहायला मिळाले. सदर घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केलेल्या ऑस्ट्रेलियाला ४९ षटकांत २६९ धावांमध्ये गुंडाळल्यानंतर भारताचा डाव ४९.१ षटकांत २४८ धावांमध्ये संपुष्टात आला. कर्णधार रोहित शर्मा (३०) आणि शुभमन गिल (३७) यांनी ६५ धावांची सलामी देत भारताला चांगली सुरुवात करून दिली. मात्र, यानंतर ठरावीक अंतराने फलंदाज बाद झाले, विराट कोहलीने ७२ चेंडूंत २ चौकार व एका षटकारासह ५४ धावांची संयमी खेळी केली. लोकेश राहुल (३२), हार्दिक पांड्या (४०) हेही चांगल्याप्रकारे स्थिरावल्यानंतर बाद झाले. सूर्यकुमार यादव सलग तिसऱ्यांदा पहिल्याच चेंडूवर बाद झाल्याचा भारताला फटका बसला. झम्पाने ४५ धावांमध्ये ४, तर एगरने ४१ धावांमध्ये २ बळी घेत भारताला जबरदस्त हादरे दिले.
त्याआधी, भारताने ऑस्ट्रेलियाला तीनशे धावांच्या आत रोखण्यात यश मिळवले. ट्रेविस हेड आणि मिचेल मार्श यांनी ६५ चेंडूंत ६८ धावांची सलामी दिली. मात्र, हार्दिक पांड्याने हेडला बाद करून ही जोडी फोडल्यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथला (0) स्वस्तात बाद केले. ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ १३८ धावांमध्ये गारद केला. मिचेल मार्शने ४७ चेंडूंत ८ चौकार व एका षटकारासह सर्वाधिक ४७ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाच्या डावात एकाही अर्धशतकाची नोंद झाली नाही. कुलदीप यादव आणि हार्दिक यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. कसोटी मालिकेत हिरो ठरलेल्या रवींद्र जडेजाला एकही बळी घेता आला नाही. मात्र, त्याने टिच्चून मारा करताना कांगारूंना जखडवून ठेवले. ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या फलंदाजांनी चांगली झुंज दिल्याने त्यांना अडीचशेचा पल्ला पार करता आला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम