नागपूर, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताच्या 251 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 242 धावांत आटोपला. त्यामुळे भारताला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आठ धावांनी विजय मिळवता आला. आता तिसरा सामना रांची येथे खेळवला जाणार आहे. रांचीला ओळख मिळवून दिली ती महेंद्रसिंग धोनीने. कारण या लहान शहरातून आलेला तो सर्वात यशस्वी कर्णधार ठरला. तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ रांची येथे दाखल झाला.
भारतापूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ रांचीच्या विमानतळावर दाखल झाला होता. ते काही काळ विमानतळावर गाड्यांची वाट पाहत होते. भारतीय संघातून पहिला विमानतळावरून बाहेर पडला तो रिषभ पंत. पण पंतनंतर बाहेर पडला तो रांचीचा लाडका सुपूत्र धोनी. विमानतळावर धोनीला पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली होती.
धोनी-रोहितचा 'तो' सल्ला विराटनं ऐकला अन् भारत जिंकला!ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं शतकी खेळी साकारून रचलेल्या पायावर अष्टपैलू विजय शंकरनं विजयाचा कळस चढवला. शेवटच्या षटकात कांगारूंना ११ धावांची गरज असताना, शंकरनं तीन चेंडूत दोन विकेट घेऊन ऑस्ट्रेलियाचा 'खेळ खल्लास' केला आणि भारतानं मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. या विजयाबद्दल 'कॅप्टन कोहली'चं कौतुक होत असलं, तरी शेवटच्या पाच षटकांमध्ये महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्माचा सल्ला मोलाचा ठरल्याचं स्वतः विराटनंच प्रांजळपणे सांगितलंय.
भारतानं दिलेल्या २५१ धावांच्या आव्हानाकडे ऑस्ट्रेलियाची वाटचाल सुरू होती. त्यांचं पारडं जरा जडच वाटत होतं. प्रत्येक चेंडू महत्त्वाचा होता. अशा वेळी, विजय शंकरला ४६वी ओव्हर टाकायला द्यायची, असा विचार विराट कोहलीनं केला होता. म्हणजे, जसप्रित बुमराहला शेवटची ओव्हर देता येईल, असं त्याचं मत होतं. परंतु, ४६ वी ओव्हर बुमराहलाच देण्याची सूचना धोनी आणि रोहितनं केली. शंकरनं त्याच्या आधीच्या षटकात १३ धावा दिल्या होत्या. त्याला ४६ वी ओव्हर दिली आणि त्यातही जास्त धावा निघाल्या, तर भारतावरचा दबाव वाढेल, हे त्यामागचं गणित होतं. ते विराटला पटलं. त्यानं बुमराहच्या हाती चेंडू सोपवला आणि त्याच ओव्हरमध्ये सामना फिरला.