T20 World Cup 2024, Indi vs Aus: आयसीसी महिला टी२० क्रिकेट स्पर्धेत महिला टीम इंडियाचा निर्णायक सामन्यात पराभव झाला. उपांत्य फेरीत गाठण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरली, पण ऑस्ट्रेलियाने ९ धावांनी भारताचा पराभव केला. कर्णधार हरपनप्रीत कौरचे प्रयत्न अपुरे ठरले आणि टीम इंडिया १४२ धावांपर्यंतच मजल मारू शकली.
विश्वचषक टी२० स्पर्धेत रविवारी (१३ ऑक्टोबर) भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये रोमांचक सामना झाला. शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी १४ धावांची गरज होती, पण महिला टीम इंडियाचे प्रयत्न अपुरे ठरले आणि ऑस्ट्रेलियाने ९ धावांनी पराभव केला.
प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया महिला संघाने १५२ धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात मैदाना उतरलेली टीम इंडिया ९ गडी गमावत १४२ धावापर्यंत पोहोचू शकली. या पराभवाबरोबरच आता भारतीय संघाचे टी २० विश्वचषकातील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.
भारतीय संघांकडून कर्णधार हरपनप्रीत कौरने नाबाद ५४ धावा केल्या, पण तिला विजय खेचून आणता आला नाही. दिप्ती शर्माने २९ धावा केल्या, तर शेफाली वर्माने २० धावा केल्या. तिघींशिवाय इतर कोणत्याही खेळाडूला चांगली कामगिरी करता आली नाही.
टीम इंडिया सेमी फायनलमध्ये जाणार?
आता सगळ्यात मोठा प्रश्न सगळ्यांना पडला आहे की, टीम इंडिया महिला टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत जाणार की नाही? याचा निर्णय आता नेट रनरेटवर ठरणार आहे. ग्रुप ए मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ सर्व ४ सामने उपांत्य फेरीत पोहोचला आहे. ४ गुणांसह टीम इंडिया दुसऱ्या क्रमाकावर आहे. टीम इंडियाचा नेट रनरेट +0.322 इतका आहे.
४ गुणांसह न्यूझीलंड तिसऱ्या क्रमांकावर आङे. त्यांच्या नेट रनरेट 0.282 इतका आहे. या ग्रुपमधील शेवटचा सामना न्यूझीलंड आणि पाकिस्तानमध्ये होणार आहे. पाकिस्तान २ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा संघ जिंकला, तर ते उपांत्य फेरीत पोहोचतील. जर पाकिस्तानचा विजय झाला, तर तीनही संघांचे गुण समान होतील आणि नेट रनरेटच्या आधारावर उपांत्य फेरीत कोण जाणार, हे ठरेल.