शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात भारतीय महिला संघाचा ऑस्ट्रेलियाने ६ गडी राखून पराभव केला. भारतीय संघाने दिलेल्या २७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला १२ चेंडूत ११ धावांची गरज होती. मेघा सिंगने ४९व्या षटकात केवळ ३ धावा देत १ बळी घेतला. पण शेवटच्या षटकात मात्र झुलन गोस्वामीला दोन चौकार खेचत ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला आणि वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम केला. तसेच गुणतालिकेतील आपलं वर्चस्व कायम राखलं.
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरूवात खराब झाली. स्मृती मानधना आणि शफाली वर्मा स्वस्तात बाद झाल्या. त्यानंतर कर्णधार मिताली राज आणि यास्तिका भाटिया दोघींनी १३० धावांची भागीदारी केली. यास्तिकाने ५९ धावा केल्या. तर मितालीने सर्वाधिक ६७ धावा कुटल्या. शेवटच्या टप्प्यात हरमनप्रीतच्या ५७ धावा आणि पूजा वस्त्रकारच्या झटपट ३४ धावांमुळे भारताने २७७ धावा केल्या. डार्सी ब्राऊनने सर्वाधिक ३ बळी टिपले.
२७८ धावांच्या बड्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाने १२१ धावांची सलामी दिली. रॅचेल हेन्स अर्धशतक (४३) हुकलं, पण एलिसा हिलीने ७२ धावांची दमदार खेळी केली. त्यानंतर एलिस पेरी (२८) स्वस्तात माघारी परतली. कर्णधार मेग लॅनिंगने अप्रतिम फलंदाजी केली पण तिचं शतक हुकलं. ती ९७ धावांवर झेलबाद झाली. मेघा सिंगने ४९वे षटक अत्यंत उत्तम टाकत सामना फिरवला होता. पण अखेर अनुभवी बेथ मूनीने शेवटच्या षटकात दोन चौकार खेचत सामना संपवला आणि ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.