Join us  

WCL 2024 : 'इंडिया चॅम्पियन्स'ने कांगारूंना शिकवला धडा; IND vs PAK अशी फायनल, आज थरार

world championship of legends 2024 ind vs pak match : इंडिया चॅम्पियन्सने ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्सचा पराभव करून फायनलमध्ये प्रवेश मिळवला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 2:03 PM

Open in App

ind vs aus world championship of legends : इंग्लंडच्या धरतीवर होत असलेल्या वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लीजेंड्स लीगच्या अंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान हे संघ भिडणार आहेत. युवराज सिंगच्या नेतृत्वातील इंडिया चॅम्पियन्सने ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्सचा दुसऱ्या उपांत्य सामन्यात पराभव करून फायनलमध्ये प्रवेश मिळवला. सिक्सर किंग युवीने त्याचा जुना अवतार दाखवत षटकारांचा पाऊस पाडला. २००७ आणि १०११ च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाची पळता भुई थोडी करणाऱ्या युवराजने शुक्रवारी तोच अंदाज दाखवला. शुक्रवारी या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स आणि इंडिया चॅम्पियन्स यांच्यात सामना झाला. युवीने पाच षटकारांच्या मदतीने २८ चेंडूत ५९ धावांची स्फोटक खेळी केली. 

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ६ बाद तब्बल २५४ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना कांगारूंना घाम फुटला अन् ते अवघ्या १६८ धावा करू शकले. इंडिया चॅम्पियन्ससाठी युवराज सिंग (२८ चेंडूत ५९ धावा), इरफान पठाण (१९ चेंडूत ५० धावा), युसूफ पठाण (२३ चेंडूत ५१ धावा) आणि रॉबिन उथप्पाने ३५ चेंडूत ६५ धावांची अप्रतिम खेळी केली. मग धावांचा बचाव करताना धवल कुलकर्णी आणि पवन नेगी यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. तर हरभजन सिंग आणि इरफान पठाण यांना १-१ बळी घेण्यात यश आले. अखेर ऑस्ट्रेलियाचा संघ निर्धारित २० षटकांत ७ बाद केवळ १६८ धावा करू शकला आणि ८६ धावांनी सामना गमावला. 

IND vs PAK किताबासाठी लढतदरम्यान, ऑस्ट्रेलियाला पराभूत करून भारतीय संघाने अंतिम फेरीत जागा मिळवली. युवराजच्या नेतृत्वातील इंडिया चॅम्पियन्सचा संघ आज शनिवारी पाकिस्तान चॅम्पियन्ससोबत किताबासाठी मैदानात असेल. युनूस खानच्या नेतृत्वातील पाकिस्तानने पहिल्या उपांत्य सामन्यात वेस्ट इंडिज चॅम्पियन्सचा पराभव करून फायनलचे तिकीट मिळवले. आता भारत आणि पाकिस्तान यातील कोणता संघ चॅम्पियन्स होतो हे पाहण्याजोगे असेल. रात्री ९ वाजल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामन्याला सुरुवात होईल. स्टार स्पोर्ट्स आणि फॅनकोडवर हा सामना पाहता येईल. 

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानयुवराज सिंगइरफान पठाणयुसुफ पठाणभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया